पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
जादा व्याजाचे आमिष व स्क्रॅप देण्याच्या बहाण्याने सुमारे तीन कोटींची रक्कम घेऊन बबलू खान हा परप्रांतीय व्यावसायिक फरारी झाल्याने पुलाची शिरोलीतील स्क्रॅप व्यावसायिकांसह अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आठ दिवसांपूर्वी खान आपल्या कुटुंबीयांसमवेत घराला कुलूप लावून पसार झाला आहे. त्याचा मोबाईल बंद असल्याने फसवणूक झालेल्या व्यवसायिकांनी शनिवारी सायंकाळी थेट शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. पाच ते सहा व्यावसायिकांनी एकत्रित येऊन अर्जाद्वारे खान विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे शिरोली ठाण्यातील एक अधिकारी आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तींची कागदोपत्री तपासणी करीत आहे .बबलू खान हा परप्रांतीय मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. अनेक वर्षांपासून कामानिमित तो शिरोलीत रहात होता. काही व्यावसायिकांच्या मदतीने तो स्क्रॅप व्यवसायात उतरला होता. त्याचा लाघवी स्वभाव, स्पष्ट आर्थिक व्यवहार, जादा व्याजाचे आमिष , कामाची पद्धत आणि स्क्रॅपची देवाण – घेवाण स्थानिक व्यवसायिकांना आपलंसं केलं होत.यामुळे अनेकांनी त्याच्याशी मैत्री करत आर्थिक गुंतवणूक केली होती . सुरुवातीच्या टप्प्यात खानने आर्थिक व्यवहार चांगला सांभाळला व अपेक्षा पेक्षा जास्त आर्थिक लाभ त्याने मिळवून दिला. यातून त्याने शिरोलीत एका कॉलनीमध्ये जागा घेऊन तीन मजली इमारत बांधली.या इमारतीवर त्याने शिरोलीतील एका पतसंस्थेचे मोठे कर्ज घेतले . ते कर्जही आता थकबाकित आहे. संबंधित संस्थेने त्या बंगल्याच्या दरवाजावर कर्जाची नोटीस बजावली आहे. तर काही व्यवसायिकांनी खानशी मैत्री करुन मोठी उलाढाल करत स्वतः:चा फायदा करून घेतला आहे. पण खानच्या अचानक गायब होण्याने अनेकांना धडकी भरली आहे.त्याचा शोध घेऊन वसुली होईलच याची सध्यातरी खात्री नाही. त्यामुळे पुढे काय? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलीस या सर्व प्रकरणाची दोन्ही बाजूने चौकशी करणार असल्याने लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे. याबाबत तपासणी पोलिस अधिकारी यांना विचारले असता तपास सुरू आहे असे सांगितले जात आहे.