पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकार
तळसंदे इथं दोन घरातून शस्त्राचा धाक दाखवून साडेअठरा तोळे सोने व रोख पन्नास हजार रुपये घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. दरम्यान अन्य दोन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नवजीवन दूध संस्थेचा सायरन वाजवल्याने गाव जागा झाला. त्यामुळे अन्य चोरीचा प्रकार टळला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथं शनिवारी मध्यरात्री माणिक बापूसो मोहिते यांच्या घराचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान या पूर्वी औद्योगिक वसाहतीतून नोकरीवरून आलेला त्यांचा मुलगा महेश मोहिते हा जागाच होता. अन्य खोलीत आवाज आल्याने त्याने दरवाजा उघडून आवाज करताच त्या खोलीतून चोरांनी पलायन केले. त्यामुळे तिथल्या चोरीचा प्रयत्न फसला.त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा महादेव राजाराम चव्हाण यांच्या गावानजीक असलेल्या शेतातील घरात वळविला. त्या घराला बाहेरून कुलूप असल्याने कुलूप तोडून प्रवेश केला त्या घरात काहीच न मिळाल्याने तेथील कुराड व कोयता घेऊन ते चोरटे नजीक असलेल्या प्रदीप मारुती चव्हाण यांच्या घरातील आतून असणारी कडी कटावणीने तोडली व प्रवेश केला. दरम्यान आवाजाने घरातील लोक जागे झाले त्यामुळे चोरट्यांनी प्रदीप चव्हाण यांच्या आईच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन हिसकावून घेऊन पलायन केले.
यानंतर चोरट्यांनी तळसंदे वारणानगर रोडवरील सीमा बायोटेक नजीक असलेल्या बाळासाहेब चौगुले वाठारकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. या घरातील बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी गावातच असलेल्या नातेवाईकांच्या घरी रात्री गेले होते. मुलगा सुधीर बाहेरगावी गेला होता. त्यामुळे बाळासाहेब यांनी जाताना घराला बाहेरून कुलूप लावले होते. व घरी त्यांची सून प्रीतम सुधीर चौगुले व नात सिद्धी सुधीर चौगुले (वय 4) या घरी होत्या . चोरट्यांनी घराला बाहेरून असलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. एका खोलीतील रोख रक्कम चोरट्यांना मिळाली. दरम्यान दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच तिथे सून प्रीतम व नात सिद्धी झोपल्या होत्या. चोरट्यांचा आवाज ऐकून त्या जाग्या झाल्या व भयभीत झाल्या .चोरट्यांनी प्रीतम व सिद्धी यांच्या गळ्याला चाकू व कोयता लावला. आणि तिजोरी फोडली त्या तिजोरीत अठरा तोळे सोने व रोख ४५ हजार रुपये घेऊन पलायन केले. प्रीतम व सिद्धी जोर जोराने ओरडू लागल्याने शेजाऱ्यांना जाग आली परंतु चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वीच शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी नवजीवन दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून सायरन वाजविण्यात आला. त्यामुळे अख्खा गाव जागा झाला. तोपर्यंत चोरांनी पलायन केले होते. दोन्ही घरातील मिळून साडेअठरा तोळे सोने व रोख 50 हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले.दरम्यान या चोरीची माहिती पेठ वडगाव पोलीसात दिली.आज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, गडहिंग्लजचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व जयसिंगपूरच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या. श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने घटनास्थळा पासून ते सीमा बायोटेक जवळील तळसंदे- वारणानगर राज्य मार्गापर्यंत मार्ग दाखवला त्यानंतर श्वान तिथेच घुटमळले.