शिरोळ / प्रतिनिधी
भाजी घ्या भाजी,ताजी ताजी भाजी अशी आरोळी देत आज चिमुकल्यानी आपण आणलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी हाक दिली.तर पालकांची विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. हे चित्र होते येथील राजाराम विद्यालय क्रमांक २ या शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी भरवला होता.आठवडी बाजार विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आणि गणितातील सांख्यिकी प्रश्न समजावेत यासाठी आठवडी बाजार हा उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून राजाराम विद्यालयात शुक्रवारी सायंकाळी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.या बाजारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पाले व फळभाज्या कडधान्य विविध खाद्यपदार्थ फळफळावळे कॉस्मेटिक व स्टेशनरी वस्तू विक्रीसाठी आणले होते.आपली वस्तू खरेदी करण्यासाठी सर्व विद्यार्थी ग्राहकांना व्यापाऱ्याप्रमाणे मोठ्या आवाजात साद घालत होते.पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी करीत असताना वस्तूची कमी जास्त दरात मागणी करत विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान कसे आहे.याची माहिती घेतली यामुळे हा आठवडी बाजार उस्फूतपणे पार पडला.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे उपाध्यक्षा सौ शितल जगदाळे सदस्या प्रियांका इंगळे सदस्य मारुती जाधव यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीता चव्हाण,अध्यापिका सुनंदा पाटील,त्रिशला येळगुडे, मीनाक्षी हेगाण्णा,अध्यापक सनी सुतार यांनी आठवडी बाजारासाठी विशेष परिश्रम घेतले.