तपासातील त्रुटींची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

 हातकणंगले येथील चर्चित अत्याचार प्रकरणाच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत सकल मराठा समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याने आरोपींना फायदा होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला.

पत्रकार परिषदेत प्रसिद्धीपत्रकाद्वारे तपासातील दहा प्रमुख त्रुटी निदर्शनास आणण्यात आल्या. व्हॉट्सॲप चॅटमधील आक्षेपार्ह मजकुराच्या आधारे कठोर कलमे न लावणे, पीडितेचे फोटो व व्हिडिओ पाहताना महिला पंचांची उपस्थिती न ठेवणे, पंचनाम्यात संदिग्ध शब्दांचा वापर, डिजिटल पुराव्यांचे टाइम-स्टॅम्प व डेटा रिकव्हरीची प्रक्रिया न करणे, तसेच मुख्य गुन्ह्याऐवजी इतर बाबींवर भर दिल्याचा आरोप करण्यात आला.

याशिवाय आरोपींची ओळख परेड (टीआयपी) न घेणे, नातेवाईकांच्या जबाबातील महत्त्वाच्या बाबींची नोंद न करणे, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) व कथित कटाचा तपास न करणे, तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे कलम वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आल्याने तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचेही सांगण्यात आले.

या प्रकरणात आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील तरतुदीनुसार पूरक दोषारोपपत्र दाखल करावे, विशेष सरकारी वकील नेमून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सकल मराठा समाज व सकल हिंदू समाज राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला.या पत्रकार परिषदेस प्रमुख वक्ते धवलसिंह (दादा) मोहिते पाटील, दीपक अण्णा काटे प्रकाशजी बेलवाडे, बाबा घोरपडे संताजी व्यंकटेशजी मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेस सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!