पारदर्शकतेसाठी दोन महिन्यांत उभारणी; महिनाअखेरीस निधी संकलन पूर्ण करण्याचे आवाहन
शिरोळ / प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उसाचे वजन आणि रिकव्हरी एकाच ठिकाणी समजावी तसेच साखर कारखानदारीत अधिक पारदर्शकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आंदोलन अंकुश संघटनेच्या माध्यमातून शेतकरी वजन काट्यावर अत्याधुनिक उसाची रिकव्हरी तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी दिली. प्रयोगशाळेची उभारणी येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यासाठी आवश्यक निधी संकलन चालू महिन्याअखेरीस पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.शेतकरी वजन काट्यावर आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना चुडमुंगे म्हणाले की, कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दुधगंगा नदीकाठचा परिसर देशात सर्वाधिक उसाची रिकव्हरी देणारा झोन म्हणून ओळखला जातो. मात्र, कारखान्यांच्या सरासरी रिकव्हरीवर आधारित एफआरपी प्रणाली लागू झाल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी सरासरी रिकव्हरी कमी दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत उसाला मिळणारा दर सुमारे अडीच ते तीन हजार रुपयांच्या आसपासच राहिल्याचा आरोप त्यांनी केला.कारखाने जाहीर करीत असलेल्या रिकव्हरीची सत्यता पडताळण्यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करून दिलेली नसल्याने संघटनेच्या माध्यमातून ही प्रयोगशाळा उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रयोगशाळेमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रिकव्हरीची माहिती मिळेल आणि साखर कारखानदारीतील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या प्रयोगशाळेत प्रगत तंत्रज्ञानयुक्त डिजिटल पोलॅरोमीटरसह अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मान्यताप्राप्त इन्स्ट्रुमेंटचा वापर करण्यात येणार असल्याने प्रयोगशाळेत मिळणाऱ्या रिकव्हरी अहवालावर तांत्रिक आक्षेप घेणे शक्य होणार नाही. त्यासाठी अतिरिक्त खर्च अपेक्षित असला तरी सर्वांनी निधी संकलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.बैठकीस राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, नागेश काळे, संजय चौगुले, उद्धव मगदूम, अचिन हेरवाडे, रशीद मुल्ला, देवेंद्र चौगुले, अनिल हुपरीकर, धनाजी माने, पिंटू ढेकळे, धनंजय जगनाडे, सारंग परीट, सर्जेराव बाबर, प्रकाश पाटील, अनिल केस्ते, भूषण गंगावणे, अमोल गावडे, प्रमोद नाईक, पृथ्वीराज चुडमुंगे, शशिकांत काळे यांच्यासह संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.