हेरवाडच्या जमादार मळ्यातील चिमुकल्यांची शिवभक्तीची अनोखी किमया! मुस्लिम चिमुकल्यांनी साकारला छत्रपती शिवरायांचा देखणा किल्ला; सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा दिला सुंदर संदेश
हेरवाड | प्रतिनिधी
दिवाळी म्हटले की लहान मुलांचा उत्साह, किल्ले उभारण्याची लगबग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा देणारे वातावरण सर्वत्र पाहायला मिळते. याच दिवाळीच्या सुट्टीत हेरवाड (ता. शिरोळ) येथील जमादार मळ्यातील चिमुकल्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि शिवप्रेमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुस्लिम समाजातील या चिमुकल्यांनी एकत्र येत उपलब्ध साहित्याचा कल्पक वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा देखणा किल्ला साकारला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे हेरवाड परिसरातून कौतुक होत आहे.
या चिमुकल्यांनी किल्ला उभारण्यासाठी उपलब्ध साहित्याची जुळवाजुळव केली. अत्यंत मेहनत आणि कल्पकतेने किल्ल्याची आकर्षक रचना केली. किल्ल्याचे भक्कम बुरुज, तटबंदी, सैनिकांच्या जागा आणि गडाची हुबेहूब प्रतिकृती पाहताना त्यांच्या कलात्मक कौशल्याची प्रचिती येते. केवळ मनोरंजन म्हणून किल्ला न उभारता त्यामागील ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्नही या मुलांनी केला आहे.
विशेष म्हणजे, मुस्लिम समाजातील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला साकारून सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याचा एक सुंदर संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना सर्व जाती-धर्मांतील मावळ्यांना सोबत घेतले. त्यांच्या सर्वसमावेशक विचारांचा आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. हाच विचार या चिमुकल्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला आहे.
आजच्या काळात जात-धर्माच्या भिंती ओलांडून प्रेम, बंधुभाव आणि एकोप्याची भावना जोपासणे किती महत्त्वाचे आहे, हे या लहानग्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे केवळ शिवप्रेमच नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचेही दर्शन घडले आहे.
लहान वयातच इतिहासाविषयीची आवड, महापुरुषांप्रती आदर आणि एकत्रितपणे काहीतरी सर्जनशील करण्याची वृत्ती जोपासणाऱ्या या चिमुकल्यांचे हेरवाडसह परिसरातून विशेष कौतुक होत आहे.