कबड्डी, व्यायामातून शारीरिक बळ अन् माणुसकीचे संस्कार! बाल शिवाजी मंडळाची ७४ वर्षांची गौरवशाली परंपरा – पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

कबड्डी, व्यायामातून शारीरिक बळ अन् माणुसकीचे संस्कार! बाल शिवाजी मंडळाची ७४ वर्षांची गौरवशाली परंपरा; खेळाडूंसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा सन्मान

पृथ्वीराजसिंह यादव : मंडळाच्या माध्यमातून घडताहेत सक्षम खेळाडू आणि जबाबदार नागरिक; व्यायामशाळेच्या दुसऱ्या मजल्याचे काम लवकरच सुरू करणार

शिरोळ | प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्रातून केवळ शरीर कमावले जात नाही, तर शिस्त, जिद्द, संघभावना आणि माणुसकीचे संस्कारही घडतात. याच विचारांचा वारसा जपत शिरोळ येथील बाल शिवाजी मंडळाने गेल्या ७४ वर्षांपासून क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कबड्डी आणि व्यायामाच्या माध्यमातून शारीरिक बळकटी मिळण्याबरोबरच सामाजिक जीवनात कसे वावरावे आणि माणूस म्हणून कसे जगावे, याचेही धडे या मंडळातून मिळत आहेत. मंडळाने विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवून शिरोळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, असे गौरवोद्गार उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी काढले.

येथील बाल शिवाजी मंडळ (राजवाडा) यांचा ७४ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी यादव बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडचे सचिव रवीकरण गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंडळाचे सचिव प्रा. आण्णासाहेब माने गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविकातून मंडळाच्या ७४ वर्षांच्या वाटचालीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला.

मंडळाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देताना यादव यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून मंडळाच्या व्यायामशाळेच्या दुसऱ्या मजल्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मंडळाच्या क्रीडा सुविधांमध्ये आणखी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक आणि अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच विविध पदांवर निवड झालेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये प्रवीण चुडमुंगे, खंडेराव जगदाळे, नितीन शेट्टी, डॉ. त्रिवेणी पाटील, अनुराधा माने, जयश्री पाटील, नरेश माने, रोहन गावडे, अवधूत पाटोळे, प्रवीण माळी, अशोक इंगळे, प्रा. आण्णासाहेब माने गावडे, चंद्रकांत माने गावडे, मयूर गावडे, भालचंद्र ठोंबरे, विराज माने देशमुख, सौरभ इंगळे, शुभम फल्ले, बाळकृष्ण माने, संदीप महात्मे, ज्ञानेश्वर पाटील आणि सचिन मोरे यांचा समावेश होता.

प्रमुख पाहुणे रवीकरण गायकवाड आणि शिवव्याख्याते उदयसिंह मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई,माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने,माजी सरपंच गजानन संकपाळ, उद्योजक सचिन माळी, बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख, नगरसेविका अनिता संकपाळ, रेखा कोरे, दीपाली फल्ले, अनुराधा गुरव, शिवानी कांबळे, नगरसेवक दीपक भाट, विजय आरगे, उल्हास आवळे, ओंकार गावडे, सचिन शिंदे, निलेश गावडे, अमरसिंह शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्य, खेळाडू, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्णा गावडे यांनी सूत्रसंचालन केले.

७४ वर्षांची परंपरा म्हणजे केवळ वर्धापन दिन नव्हे, तर अनेक पिढ्यांना क्रीडा संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारा प्रेरणादायी प्रवास असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.

Leave a Comment

error: Content is protected !!