घरमालकाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप मुलीने गमावला जीव
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
नागांव (ता. हातकणंगले) येथील संभाजीनगरमध्ये एका परप्रांतीय कामगाराच्या ३ वर्षांच्या चिमुरडीचा विजेचा जोरदार झटका (करंट) लागून जागीच मृत्यू झाला.ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.मीटर पेटीतील विजेचा प्रवाह खांबाला ताण देणाऱ्या लोखंडी सळीमध्ये उतरल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलीस आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.राजलक्ष्मी प्रताप निशाद (वय ३, मूळ रा. कुडाळ, जि. फत्तेपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. संभाजीनगर, नागांव) असे मृत मुलीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजलक्ष्मीचे वडील प्रताप निशाद हे शिरोली एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ते गेल्या एक वर्षापासून संभाजीनगर येथील कृष्णात साळुंखे यांच्या खोलीत भाड्याने राहत आहेत. प्रताप यांना दोन अपत्ये असून,त्यापैकी राजलक्ष्मी ही लहान होती.रविवारी सकाळी राजलक्ष्मी घरासमोर खेळत असताना, तिचा हात अचानक विजेच्या खांबाला आधार देण्यासाठी जमिनीत रोवलेल्या लोखंडी ताण सळीला लागला.या सळीत विजेचा प्रवाह उतरला असल्याने तिला तीव्र झटका बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमागे घरमालकाचा मोठा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.घरमालक साळुंखे यांनी परिसराची स्वच्छता व विस्कळीत झालेल्या वायर बाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अनेकदा सूचना देऊनही खोल्यांमधील लाईट फिटिंगकडे दुर्लक्ष केले.खोल्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत.ही झुडपे विजेच्या खांबावरील तारांना स्पर्श करत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित व्हायचा. ती झुडपे काढण्यास सांगूनही घरमालकाने कोणत्याही सुचनेचे पालन केले नाही,अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.सुरुवातीला विजेच्या खांबावरूनच ताण तारेत करंट उतरल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होती. मात्र, स्थानिक लेवला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत आणि पंचनाम्यात घरमालकाचे धक्कादायक कारनामे उघड झाले आहेत कि घरमालकाने मीटरचे मेन स्विच डायरेक्ट केले आहे ,मीटर पेटी अत्यंत खराब अवस्थेत होती.मेन स्विचच्या आउटगोइंग सप्लायला दोन जॉईंट्स होते आणि सर्व्हिस वायरची योग्य फिटिंग केलेली नाही , मीटरमधून कोणतीही अर्थिंग देण्यात आली नाही , मीटरमधील मेन स्विचमध्ये फ्युजच नाहीत , महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, विजेच्या खांबावरील ताण तारेमध्ये इन्सुलेटर असल्यामुळे खांबावरून करंट खाली उतरणे शक्य नाही.मात्र,मीटर पेटीतून बाहेर आलेल्या आणि तिथेच अडकवून ठेवलेल्या एका उघड्या तारेमुळे हा करंट ताण सळीमध्ये उतरला आणि मुलीचा घात झाला.या संपूर्ण प्रकारात हलगर्जीपणा करणाऱ्या घरमालकावर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी परिसरातून होत आहे.या निष्पाप चिमुरडीच्या मृत्यूमुळे निशाद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.