पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या वतीने पुलाची शिरोली येथील सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग बांधवांसाठी एस.टी. प्रवास सवलत कार्ड नोंदणी शिबिराचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शासनाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना सहज आणि सुलभ पद्धतीने मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन माजी उपसरपंच कृष्णात करपे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौदाडे, उपसरपंच विजय जाधव आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
शिबिरामध्ये लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे तपासून एस.टी. प्रवास सवलत कार्डासाठी नोंदणी करण्यात आली. तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि शासनाने निश्चित केलेल्या नियमांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत संघटनेचे आभार मानले.
यावेळी माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार, दीपक यादव, बटील देसाई, योगेश खवरे, बाळासो पाटील, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अर्जुन चौगुले, प्रकाश शिंदे, श्रीधर पाटील, सचिन गायकवाड, संदीप तानवडे, शिरोली विकास सोसायटीचे संचालक धनाजी पाटील, राष्ट्रसेवा युवक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष बाळासो तानवडे, राष्ट्रसेवा प्रशालेचे संस्थापक प्रताप चोपडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध तयारी करून लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.