नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेसोबत प्रस्तावित व्यापार कराराच्या विरोधात दिल्लीतील किसान घाटावर आंदोलनासाठी जमलेल्या शेतकरी नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना राजघाट परिसरात ताब्यात घेण्यात आले.या घटनेनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, केंद्र सरकारवर विरोधकांनी दडपशाहीचा आरोप केला आहे.ताब्यात घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सोशल मीडियावर त्यांनी, “विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांचे आंदोलनही चिरडण्याचा डाव रचला जात आहे. आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्याचे काम सरकार करत आहे,” असा आरोप केला. तसेच “मोदी सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? शेतकऱ्यांना अशा पद्धतीने अडवले, तर देशभरातील शेतकरी याला तीव्र उत्तर देतील,” असा इशाराही त्यांनी दिला.शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये, “महादेव जानकर आणि मला राजघाट परिसरात किसान घाटाकडे जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले,” अशी माहिती देत सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदवला.दरम्यान, अमेरिकेसोबत होणाऱ्या प्रस्तावित व्यापार करारामुळे देशातील शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताला मोठा फटका बसेल, असा आरोप करत देशभरातील १५४ हून अधिक शेतकरी संघटनांनी किसान घाटावर आंदोलनाची हाक दिली आहे. विविध राज्यांतील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.प्रमुख शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवत अनेक भागांत बंदोबस्त कडक केला असून, आंदोलनस्थळी जाणाऱ्या शेतकरी नेत्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. शेतकरी संघटनांनी मात्र आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार देत सरकारने व्यापार कराराबाबत खुली चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे केली आहे.