पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
माजी खासदार तथा ज्येष्ठ सहकार नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या ९६व्या वाढदिवसानिमित्त ज्ञानदीप विद्यालय (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा), शिरोली येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून सामाजिक उपक्रमातून औचित्य साधण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी शिक्षण, सहकार आणि ग्रामीण विकास क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या हर्षदा यादव आणि माजी ग्रामपंचायत सदस्या उर्मिला जाधव-निकम यांनी मनोगत व्यक्त करत या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध घटकांनी अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या अनिता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दीपक यादव, बाजीराव जाधव, जवाहर साखर कारखान्याचे सर्कल अधिकारी कलगोंड पाटील तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अरुणा कोठावळे, शिक्षिका राजश्री जाधव यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कृष्णात पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकातून उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची ताकद असून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा मिळण्याबरोबरच समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक संदेशही पोहोचला.
कार्यक्रमाच्या शेवटी धनवान राठोड यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला बळ देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.