नगरसेविका श्वेता जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; गणेश नगरातील रस्त्यावरील अडथळा तातडीने दूर

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील गणेश नगर परिसरात, गणेश मंदिराशेजारी नुकतेच करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर पाण्याच्या व्हालसाठी बसविण्यात आलेले तीन पाईप उंच राहिल्यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच दुचाकीस्वारांसाठी हा अडथळा धोकादायक ठरत असल्याने परिसरातील नागरिकांनी ही समस्या नगरसेविका सौ. श्वेता संतोष जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली.

नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत नगरसेविका श्वेता जाधव यांनी नगरपरिषद प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत नगरपरिषदेने तातडीने कार्यवाही करत रस्त्यावर अडथळा ठरत असलेले तीनही पाईप सुरक्षितपणे कट करून नागरिकांची गैरसोय दूर केली.

या त्वरित कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेविका श्वेता जाधव यांनी नागरिकांच्या प्रश्नांबाबत दाखविलेली तत्परता आणि नगरपरिषद प्रशासनाने केलेली जलद कार्यवाही याबद्दल कौतुक केले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत वेळेत उपाययोजना करण्यात आल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका सौ. श्वेता संतोष जाधव यांचे तसेच नगरपरिषद प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न अशाच तत्परतेने मार्गी लावले जातील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!