सोलर केबल चोरट्यांचा शिरढोण-टाकवडे परिसरात धुमाकूळ; वारंवार चोरींमुळे शेतकरी संतप्त; पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा

Spread the love
शिरढोण / प्रतिनिधी
शिरढोण-टाकवडे परिसरात सोलर पॅनलच्या केबल चोरीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरढोण-नांदणी रस्त्यालगतच्या शेतांमध्ये बसविण्यात आलेल्या सोलर यंत्रणांच्या तांब्याच्या केबल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरटे लंपास करत आहेत.टाकवडे परिसरातही अशाच प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.महावितरणाच्या अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या सोलर पंप योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून सोलर यंत्रणा उभारल्या आहेत. मात्र, आता या यंत्रणाच चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. चोरीनंतर सोलर पंप बंद पडत असल्याने पिकांच्या पाण्याचे नियोजन कोलमडत आहे. ऊस, भाजीपाला आणि इतर पिकांना वेळेवर पाणी देता न आल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करूनही अद्याप एकाही चोरट्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही.त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “रात्रभर शेतात जागून पहारा द्यायचा का शेती करायची?”असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.दरम्यान,शिरोळ व कुरुंदवाड पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये तातडीने वाढ करून चोरीच्या घटनांवर आळा घालावा,संशयित टोळ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.तांब्याच्या केबलला बाजारात मोठी किंमत मिळत असल्याने सोलर यंत्रणांकडे चोरट्यांचा कल वाढल्याचे बोलले जात आहे.ग्रामीण भागात सोलर पंपांचे वाढते प्रमाण आणि पोलिस यंत्रणेची ढिलाई यामुळे चोरट्यांचे फावले असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!