भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरणासाठी शिरोळ नगरपरिषदेची व्यापक मोहीम सुरू – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

गेल्या पाच-सहा वर्षांपासून शिरोळ शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी गंभीर समस्या बनत चालला आहे.शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे.विशेषतः सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक,महिला, शालेय विद्यार्थी आणि लहान मुलांना या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक वेळा भटकी कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, मोटरसायकलींच्या मागे लागणे, तसेच लहान मुलांना चावा घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या कुत्र्यांमुळे अनेक अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर शिरोळ शहरातील महिला,विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.या मागणीची दखल घेत शिरोळ नगरपरिषदेने 24 मार्च 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.यानंतर नगरपरिषदेच्या वतीने या कामासाठी विविध संस्था आणि संघटनांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे काम करण्यासाठी कोणतीही संस्था किंवा संघटना पुढे येण्यास तयार नसल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे नगरपरिषदेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.दरम्यान, प्रशासकीय कालावधीत 4 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथील “Pets force” या भटक्या कुत्र्यांवर काम करणाऱ्या कंपनीला कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरणाचे काम देण्यात आले होते. या कराराची मुदत 4 सप्टेंबर 2025 ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, संबंधित कंपनीचे अधिकारी आणि तज्ज्ञ कर्मचारी यांच्यातील समन्वयाच्या अडचणींमुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब झाला होता.शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने संबंधित कंपनीशी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने संपर्क साधण्यात येत होता.नगरपरिषदेने या कामासाठी चिकाटी आणि पाठपुरावा कायम ठेवला.अखेर गेल्या आठवड्यात या प्रयत्नांना यश मिळाले आणि या मोहिमेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. याबाबत माहिती देताना शिरोळचे यादव आघाडीचे प्रमुख व उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी सांगितले की, संबंधित कंपनीची काही मागील देयके प्रलंबित असल्याने कंपनी काम सुरू करण्यास तयार नव्हती. ही बाब लक्षात घेत नगरपरिषदेने कंपनीची थकीत रक्कम देण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर कंपनीने काम सुरू करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड,मुंबई यांच्या 5 एप्रिल 2022 च्या परिपत्रकानुसार भटक्या कुत्र्यांवर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेबाबत शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. या नियमानुसार एका कुत्र्याला पकडणे, त्याचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करणे, त्यानंतर तीन दिवस त्याची योग्य देखभाल व खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, तसेच तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून पुन्हा तपासणी करून संबंधित कुत्र्याला त्याच परिसरात सोडणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.या प्रक्रियेसाठी शासनाच्या नियमांनुसार प्रति कुत्रा १६५० रुपये इतका खर्च निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित कंपनीला देण्यात येणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम १९ मे रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठराव करून मंजूर करण्यात आली. त्यामुळे आज, शुक्रवार दिनांक २२ मेपासून शहरात प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिली.या मोहिमेअंतर्गत शहरातील भटक्या कुत्र्यांचे टप्प्याटप्प्याने निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशांचे पालन करूनच ही कारवाई केली जाणार असून, अत्यंत हिंस्त्र कुत्र्यांच्या बाबतीत कायदेशीर नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल.इतर कुत्र्यांना मात्र निर्बिजीकरण व लसीकरण करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.नगरपरिषदेने नागरिकांनाही या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.शहरातील कोणत्याही भागात भटक्या व हिंस्त्र कुत्र्यांबाबत काही सूचना,तक्रारी किंवा माहिती असल्यास नागरिकांनी नगरपरिषदेचे कर्मचारी साहिल मकानदार यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित भागात तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या मोहिमेबाबत नागरिकांच्या मनात काही शंका, गैरसमज किंवा आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न असल्यास त्यांनी थेट नगरपरिषदेशी संपर्क साधावा. संबंधित सर्व माहिती आणि कागदपत्रे नागरिकांना दाखविण्यात येतील, असे आश्वासनही उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिले.दरम्यान, नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरातील अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे भयभीत झालेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पालकांकडून या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने ही मोहीम प्रभावीपणे आणि सातत्याने राबविल्यास भविष्यात शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!