पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निम्म्याने घसरले असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी न केल्याच्या निषेधार्थ आज शिरोली सांगली फाटा येथील कोरगांवकर पेट्रोल पंप आणि शेतकरी संघाच्या पंपावर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनतेची लूट थांबवून इंधनाचे दर तातडीने कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व करताना काँग्रेस नेते व माजी सरपंच शशिकांत खवरे म्हणाले, पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल ११० डॉलर इतका उच्चांकी असतानाही देशात पेट्रोल ७१ रुपये आणि डिझेल ५५ रुपये प्रति लिटर दराने मिळत होते. त्यावेळी इथेनॉल मिश्रण अवघे २ टक्के होते. मात्र, सध्याच्या भाजप सरकारच्या काळात कच्च्या तेलाचा भाव घसरून प्रति बॅरल अवघा ६३ डॉलर झाला आहे, तसेच इथेनॉल मिश्रणही २० टक्क्यांपर्यंत वाढवून मोठी बचत केली जात आहे. असे असतानाही देशात पेट्रोलचा दर १०३ रुपयांच्या पार आणि डिझेल ९० रुपये लिटर विकले जात आहे. सर्व बाजूंनी फायदा होत असताना सर्वसामान्यांची ही लूट कशासाठी मग जनतेचा हा पैसा नेमका जातोय कुठे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने ही लूट थांबवून तात्काळ इंधन दर कपात करावी आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी खवरे यांनी केली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, भाजप सरकार देशाचे भवितव्य घडवण्याच्या गप्पा मारते, मात्र त्यांच्याच कारभारात महत्त्वाच्या परीक्षांचे नेट पेपर फुटून देशातील तरुण पिढीचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे. तीन-चार वर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या नशिबात या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे काय आले, याचा विचार या सरकारने कधी केला आहे का ?तसेच नागावचे ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळांकुरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी केलेल्या आवाहनांचा खरपूस समाचार घेतला. सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले हे सरकार केवळ आश्वासनांची खैरात करत असल्याची टीका त्यांनी केली.या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये माजी सरपंच शशिकांत खवरे ,माजी ता.प. सदस्य उत्तम सावंत,आमीत शिंदे, जोतीराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, अतुल शिंदे, बाजीराव सातपुते, राजू सुतार, अनिल वायदंडे , उत्तम पाटील , रंजीत कदम,मन्सूर नदाफ, मुन्ना सनदे , अभिनंदन सोळंंकुरे ,राजाराम वडार , अमोल चौगले,यांच्यासह स्थानिक नागरिक आणि काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.