विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळण्यासाठी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांची पद्माराजे विद्यालयाला अचानक भेट,शिरोळ नगर परिषदेची शालेय पोषण आहारावर करडी नजर

Spread the love

शिरोळ | प्रतिनिधी

शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सकस, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळावा, यासाठी शिरोळ नगर परिषद प्राधान्याने लक्ष देणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, यासाठी पोषण आहाराची वेळोवेळी तपासणी करण्यात येणार असून पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याच पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी शनिवारी सकाळी शहरातील पद्माराजे विद्यालयाला अचानक भेट देत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची पाहणी केली. यावेळी त्यांनी आहार तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता, खाद्यपदार्थांचा दर्जा तसेच विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कशा पद्धतीने केले जाते, याची सविस्तर माहिती घेतली.

पाहणीदरम्यान श्री. यादव यांनी विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार स्वतः चाखून त्याच्या गुणवत्तेची खात्री केली. तसेच स्वयंपाकघरातील स्वच्छता, पोषणमूल्यांचा दर्जा आणि आहार वितरणातील शिस्त याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना पौष्टिक व संतुलित आहार मिळाल्यास त्यांच्या आरोग्यासोबतच शैक्षणिक प्रगतीलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष यादव म्हणाले की, शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेणे ही नगर परिषदेची सामाजिक जबाबदारी आहे.त्यामुळे प्रत्येक शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल.कोणत्याही विद्यार्थ्याला निकृष्ट दर्जाचा आहार मिळू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील.

याशिवाय लवकरच पालिकेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच प्रत्येक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व शाळांना नियमित भेटी देऊन पोषण आहाराची तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेसाठी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे शहरवासीयांकडून स्वागत होत असून त्यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!