घराघरांत जलद ताप व कंटेनर तपासणी; साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी शिरोळ नगरपालिकेकडून आरोग्य सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तसेच जलजन्य आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिरोळ नगरपालिकेने व्यापक आरोग्य सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ केला आहे.शिरोळ नगरपरिषद, घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हौसाबाई मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, निमशिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जलद ताप व कंटेनर सर्वेक्षण राबविण्यात येत असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.
या मोहिमेचा शुभारंभ शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, आरोग्य सभापती विजय आरगे तसेच नगरसेवक व नगरसेविकांच्या उपस्थितीत करण्यात आला. शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.
आरोग्य सर्वेक्षणादरम्यान वैद्यकीय पथके घराघरांत भेट देऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्यविषयक माहिती संकलित करत आहेत. ताप, सर्दी, खोकला किंवा इतर संसर्गजन्य आजारांची लक्षणे असलेल्या नागरिकांची नोंद घेऊन आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले जात आहे. याचबरोबर घर परिसरातील पाण्याच्या टाक्या, बॅरल, कुलर, सिमेंटच्या टाक्या, खराब टायर तसेच इतर ठिकाणी साचलेल्या पाण्याची तपासणी करून डासांच्या उत्पत्तीची संभाव्य ठिकाणे शोधली जात आहेत.
ज्या भागांमध्ये डासांची पैदास होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी तातडीने डीडीटी पावडर टाकणे, औषध फवारणी करणे आणि स्वच्छतेच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये आणि ताप किंवा अन्य लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, हौसाबाई मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच नगरपालिकेचे कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत. रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या नगरपालिकेच्या या पुढाकाराचे शहरवासीयांकडून स्वागत होत असून, ही मोहीम आरोग्यदायी व स्वच्छ शिरोळ घडविण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!