शिरोळ / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील ईश्वरपूरमध्ये श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, ईश्वरपूर संचलित शिक्षणमहर्षी श्री आण्णासाहेब डांगे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री आण्णासाहेब डांगे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.राज्यभरातील सुमारे ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले.या स्पर्धेत कै.दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या कुस्ती व मल्लखांब केंद्रातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले.
वैयक्तिक गटात १८ वर्षांखालील मुलांच्या गटात मयूर गावडे याने शानदार कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. त्याच्या या यशामुळे मंडळाच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशिक्षकांच्या मेहनतीला योग्य फळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सांघिक गटातही मंडळाच्या खेळाडूंनी प्रभावी सादरीकरण केले. १८ वर्षांखालील मुलांच्या संघात आज्ञेश मुडशिगिकर, अथर्व कोळी, विज्ञान तमायचे, पृथ्वीराज अरागे, हर्षवर्धन गावडे आणि मयूर गावडे यांनी उत्कृष्ट समन्वय व कौशल्याचे प्रदर्शन केले. तसेच १६ वर्षांखालील मुलींच्या संघात अनुपमा पाटील, मुक्ता धनगर, कावेशी कुंभार, अमृता पाटील, निशिगंधा आंबी आणि भूमिका पाटील यांनी आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर करत प्रेक्षकांची दाद मिळविली.
यावेळी मंडळासाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे इंडियन आर्मीमध्ये भरती झालेल्या पै. अभिजीत विरेंद्र यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंसह पै. अभिजीत विरेंद्र यादव यांचा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख तथा सहकारमहर्षी गणपतराव पाटील (दादा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक संजीव देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धूमे, प्रशिक्षक संजय देबाजे, चंद्रशेखर कलगी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या बळावर मिळविलेल्या या यशामुळे कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडा परंपरेत आणखी एका मानाच्या पर्वाची भर पडली असून, संस्थेच्या तसेच परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.