दिल्लीत शेतकरी-विद्यार्थ्यांवर पोलिसी दडपशाही; जयसिंगपूरात स्वाभिमानीची सरकारविरोधी निर्दशने

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

अमेरिकेसोबत प्रस्तावित ट्रेड डीलच्या विरोधात दिल्लीतील किसान घाट येथे आंदोलनासाठी जमलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह १५४ शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी आणि हजारो शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथील क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी केंद्र सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

याचवेळी, NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकार पोलिसी बळाचा वापर करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

निषेध सभेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते पै.विठ्ठल मोरे यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. “शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून आंदोलनकर्त्यांवर अटकसत्र आणि लाठीमार करणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब आहे. दडपशाहीने जनतेचा आवाज कधीच दाबला जाणार नाही,”असे ते म्हणाले.

या आंदोलनात सचिन शिंदे, रावसाहेब आलासे, तानाजी वठारे, विशाल चौगुले, वासू भोजणे, चंद्रकांत जाधव,शंकर नाळे,विक्रम पाटील, श्रीकांत पाटील, कुमार सुतार, अविनाश कोडोले, विजय कर्वे, दिग्विजय सूर्यवंशी, नेमीनाथ मादनाईक, किरण पाटील, अभय भिलवडे, अमोल कांबळे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांती चौकात झालेल्या या आंदोलनातून केंद्र सरकारने शेतकरी आणि विद्यार्थ्यांवरील दडपशाही तातडीने थांबवून लोकशाही मार्गाने व्यक्त होणाऱ्या आंदोलनांचा सन्मान करावा, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!