“या नेत्यांच्या भावी खासदार”च्या बॅनरने हातकणंगले लोकसभा मतदार संघात राजकीय चर्चांना उधाण
वडगाव परिसरात माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा; आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना वेग
हातकणंगले / प्रतिनिधी
वडगाव परिसरात माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा “भावी खासदार” असा उल्लेख असलेले डिजिटल बॅनर झळकल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैभव हिरवे यांच्या नेतृत्वाखाली हे बॅनर लावण्यात आल्याची चर्चा असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.या बॅनरमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असून, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे.
वडगाव परिसरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या डिजिटल बॅनरवर माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे छायाचित्र आणि “भावी खासदार” असा ठळक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आवाडे यांच्या संभाव्य लोकसभा उमेदवारीबाबतच्या चर्चांना नव्याने बळ मिळाले उमेदवारीबाबतच्या चर्चांना नव्याने बळ मिळाले आहे.बॅनर झळकताच अनेकांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याने या विषयाची चर्चा आणखी रंगली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, अशा प्रकारचे बॅनर अनेकदा कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करणारे असतात.मात्र, त्यामागे भविष्यातील राजकीय रणनीतीचे संकेतही दडलेले असू शकतात. त्यामुळे या बॅनरकडे केवळ शुभेच्छा किंवा समर्थन म्हणून न पाहता, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आगामी हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच या डिजिटल बॅनरबाबत माजी आमदार प्रकाश आवाडे किंवा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या बॅनरमागील उद्देश आणि त्यामागील राजकीय संदेश काय, याविषयी उत्सुकता कायम आहे.
एकंदरीत, वडगाव परिसरात झळकलेल्या “भावी खासदार” या उल्लेखाच्या डिजिटल बॅनरमुळे मतदारसंघातील राजकीय चर्चांना नवे परिमाण मिळाले आहे.अधिकृत घोषणा होईपर्यंत या बॅनरच्या निमित्ताने सुरू झालेल्या चर्चांना आणि राजकीय तर्क-वितर्कांना आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.