जयसिंगपूर / प्रतिनिधी
पार्वती को-ऑप इंडस्ट्रियल इस्टेटच्या युनिट क्रमांक २ मधील विकासकामांना वेग आला असून, एकूण १३ भूखंडांपैकी ११ भूखंडांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. आवश्यक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून उर्वरित कामेही अंतिम टप्प्यात आहेत. येत्या काळात सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर येथे उद्योग सुरू होतील. आतापर्यत या प्रकल्पामुळे ३५० हून अधिक उद्योजकांना उद्योग उभारणीची संधी मिळाली असून २० हजारांहून अधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला असल्याची अशी माहिती पार्वती को-ऑप इंडस्ट्रियल इस्टेटच्या युनिट क्रमांक २ चे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) अभिजीत पाटील यांनी दिली.
उदगाव येथील युनिट क्रमांक २ मध्ये उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक सुविधांमध्ये अंतर्गत रस्ते,पाणीपुरवठा आणि स्ट्रीट लाईटची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.तसेच ट्रान्सफॉर्मर व वीजपुरवठ्यासंदर्भातील उर्वरित कामांना संबंधित विभागांकडून मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
अभिजीत पाटील म्हणाले,औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेली सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.आवश्यक परवानग्या,कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच भूखंडधारकांना उद्योग सुरू करता येणार आहेत.त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक वाढेल.
या औद्योगिक प्रकल्पामुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.लघु,मध्यम आणि विविध उत्पादन क्षेत्रांतील उद्योग येथे कार्यरत झाल्यानंतर सहाय्यक व्यवसायांनाही मोठी संधी मिळेल.त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
पार्वती को-ऑप इंडस्ट्रियल इस्टेटच्या युनिट क्रमांक २ मध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळे उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून,उर्वरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा औद्योगिक प्रकल्प परिसरातील रोजगार आणि औद्योगिक प्रगतीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.