शिरोळ / प्रतिनिधी
“बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम… जय जय विठू-रुक्माई…” अशा विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात शिरोळ येथे ह.भ.प. श्रीगुरु एकनाथ आप्पा वासकर महाराज यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.अधिक मासानिमित्त वासकर वारकरी संप्रदाय व समस्त शिरोळकर नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आध्यात्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.हनुमान मंदिर,गावडे गल्ली येथे आयोजित या सप्ताहाच्या प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्माई तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. आप्पासो पुजारी यांच्या हस्ते विणापूजनाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी वासकर वारकरी संप्रदायातील वारकरी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोहळ्याच्या प्रारंभी ध्वजपूजनाचा कार्यक्रमही मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्योजक गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे, पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, नगरसेवक ओंकार गावडे, सचिन शिंदे, निलेश गावडे, माजी नगरसेवक पैलवान प्रकाश गावडे, आनंदराव माने-देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.ह.भ.प. कृष्णात पाटील व वारकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने पंचपदी सादर केल्यानंतर व्यासपीठ चालक ह.भ.प. श्रीगुरु एकनाथ आप्पा वासकर महाराज यांच्या उपस्थितीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पारायणामुळे भक्तांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत असून सप्ताहाच्या निमित्ताने धार्मिक वातावरण अधिकच मंगलमय झाले आहे.दुपारच्या सत्रात विठू माऊली भजनी मंडळ, शिरोळ यांच्या वतीने हरिभजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. नामस्मरण आणि अभंगगायनामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. सायंकाळी ह.भ.प. सागर दिलीप राडे (मर्दवाडी) यांनी आपल्या प्रवचनातून संत साहित्य, नाममहिमा आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारप्रवर्तक आणि ओघवत्या शैलीतील प्रवचनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.रात्रीच्या सत्रात ह.भ.प. भिकाजी शिंदे (कासारवाडी) यांचे कीर्तन संपन्न झाले. कीर्तनामधून त्यांनी संतवाङ्मयातील विचार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे मांडला. त्यानंतर श्री हरी भजनी मंडळ, शिरढोण यांच्या जागरभजनाने भक्तिमय वातावरणाची रंगत अधिकच वाढवली. टाळ, मृदुंग आणि वीणेच्या सुरेल साथीने सादर झालेल्या भजनांनी उपस्थितांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली.या सप्ताहानिमित्त श्री हनुमान मंदिर परिसरात मोठा व प्रशस्त शामियाना उभारण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सकाळी चहा व अल्पोपहार, दुपारी महाप्रसादरूपी भोजन, सायंकाळी चहा तसेच रात्री भोजनाची उत्तम व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक विशेष दक्षता घेत आहेत.सप्ताहाच्या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज प्रवचन, कीर्तन, भजन, हरिपाठ आणि नामस्मरणाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे शिरोळ परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमांना उपस्थित राहत असून विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, उपाध्यक्ष रमेश गावडे, खजिनदार रमाकांत संकपाळ, ऑडिटर बाळासाहेब कोळी, स्वागताध्यक्ष दिलीपराव माने यांच्यासह वासकर वारकरी संप्रदाय, समस्त गावडे समाज, विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम असलेल्या या सप्ताहामुळे शिरोळ नगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून विठ्ठल नामाच्या अखंड गजरात सुरू झालेला हा सप्ताह भाविकांच्या जीवनात अध्यात्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरत आहे.