पै.अमृता पुजारी कुस्ती संकुलासाठी १ कोटींचा निधी; युवा खेळाडूंना नवी संजीवनी – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव 

Spread the love

शिरोळमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील बिरदेव नगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी महिला कुस्तीपटू डबल महाराष्ट्र केसरी पै.अमृता पुजारी यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या “पै.अमृता पुजारी कुस्ती संकुल व व्यायामशाळेसाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल” अशी घोषणा केली. या घोषणेमुळे परिसरातील युवा कुस्तीपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.होळकर तरुण मंडळ व समस्त धनगर समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जयंती सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राला चालना देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अभ्यासिका”चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी समाजातील युवकांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करावी, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. पै. अमृता पुजारी यांच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय यशाचा उल्लेख करत त्यांनी या कुस्ती संकुलामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर मनोगते व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. वेदिका पुजारी, प्रज्ञा अनुसे, शौर्य पुजारी, आराध्या खिलारे,प्रतीक्षा अनुसे, प्रांजली अनुसे, संकल्प पुजारी, समर्थ पुजारी, आदीश्री पुजारी, स्नेहा पुजारी, मुक्ता धनगर, युवराज कणके आणि श्रद्धा धनगर या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. त्यांच्या सहभागाचे कौतुक करत नगराध्यक्षा योगिता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि रोख पारितोषिक देऊन गौरविले.या सोहळ्यात महिला कुस्तीपटू डबल महाराष्ट्र केसरी पै. अमृता पुजारी यांच्या यशामागील प्रेरणास्थान असलेल्या त्यांच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. वडील शशिकांत पुजारी आणि आई मनीषा पुजारी यांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर नाव कमावणाऱ्या खेळाडूंच्या कुटुंबीयांचा गौरव झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.सायंकाळी कासेगावचे प्रा. अरुण घोडके यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर व्याख्यान झाले. त्यांनी अहिल्यादेवींच्या कणखर नेतृत्वाचा, लोककल्याणकारी निर्णयांचा आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या विचारांमधून युवकांनी प्रेरणा घेऊन समाज आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमास नगरसेविका सविता पुजारी, शोभा कोरे, माजी नगरसेवक डॉ. अरविंद माने, दादासो कोळी, के. एम. भोसले, एस. एस. पाटील, सुरज कांबळे, चंद्रशेखर कांबळे, संजीव पुजारी, अमर पुजारी, काशिनाथ गुपचे, ओंकार वंटे, अजित पुजारी, आप्पासो पुजारी, रामा वंटे, रामा पुजारी यांच्यासह समस्त धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.क्रीडा क्षेत्रासाठी जाहीर झालेला १ कोटी रुपयांचा निधी आणि पै. अमृता पुजारी यांच्या नावाने उभारले जाणारे कुस्ती संकुल हे शिरोळ तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार असून, ग्रामीण भागातील कुस्ती परंपरेला नवी उभारी देणारे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!