तेरवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील गंगापूर उपनगरात बुधवारी (दि. २२ जुलै) दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत आयुब युसूफ बेपारी यांचे घर मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले.या दुर्घटनेत मुलीच्या प्रसूतीसाठी ठेवलेली सुमारे ९० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच संसारोपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले.या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास घरातील बेडरूममधील विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण घर धुराने वेढले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते इरफान बेपारी, स्वप्नील शिंदे, फारूक बेपारी, आदर्श उगळे, पंकज म्हावळे, विकास आवळे, सूरज उगळे यांच्यासह ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाबाहेर गेल्याने कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाचे नितीन संकपाळ, हेमंत वायचळ आणि यश शिरोळकर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत घरातील गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढला. त्यानंतर छताचे पत्रे फोडून पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आग शेजारील घरांपर्यंत पसरण्याचा मोठा धोका टळला.
घटनेचा पंचनामा तलाठी एस. एस. खोत यांनी केला. ग्रामपंचायत अधिकारी संजय पुकाळे, पोलीस निरीक्षक संतोष माने, माजी सरपंच संजय अनुसे तसेच पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि बेपारी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या घटनेमुळे तेरवाड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शॉर्टसर्किटमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी घरांतील विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.स्थानिक नागरिकांनी बेपारी कुटुंबाला शासकीय मदत तत्काळ मिळावी, अशी मागणी केली आहे.