शिरोळातून स्वामी भक्तांच्या पायी दिंडीचे अक्कलकोटकडे प्रस्थान
‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’च्या अखंड जयघोषात भक्तिमय वातावरण; गुरुपौर्णिमेनिमित्त १७ वर्षांची सेवा परंपरा कायम
शिरोळ / प्रतिनिधी
गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त शिरोळ येथील श्री स्वामी समर्थ भक्तांच्या पारंपरिक पायी दिंडीचे बुधवारी सकाळी भक्तिमय वातावरणात अक्कलकोटच्या दिशेने प्रस्थान झाले. ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. स्वामींच्या नामस्मरणात आणि भक्तिभावाने भारावलेल्या वातावरणात शेकडो स्वामीभक्तांनी दिंडीत सहभागी होत गुरुपौर्णिमेच्या सेवायात्रेचा शुभारंभ केला.
गेल्या १७ वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त शिरोळ येथील स्वामीभक्त पायी दिंडीच्या माध्यमातून अक्कलकोटला जात असून, तेथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा देण्याची परंपरा त्यांनी अखंडपणे जपली आहे. यंदाही दि. २९ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त ही दिंडी मोठ्या उत्साहात रवाना झाली.
दिंडी प्रस्थानापूर्वी वाहनांचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. या प्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, श्री स्वामीभक्त बाळासाहेब चव्हाण, बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव जगदाळे, आयझाक भोरे, अशोक नाईक, श्रीकांत माने गावडे, अंकुश पाटोळे, दीपक मोहिते, अमर जाधव, अमर पाटील, उल्हास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवून दिंडीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वामीभक्तांना शुभेच्छा देत, ही सेवा परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. स्वामी समर्थांच्या नामस्मरणातून समाजात श्रद्धा, सेवा आणि सद्भावनेचे संस्कार अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या वतीने दिंडीचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. अध्यक्ष संजय चव्हाण, मार्गदर्शक उमेश कोळी, उपाध्यक्ष सत्यजित (बबलू) काशीद यांच्यासह चंद्रकांत भाट, प्रकाश कोळी, तुकाराम पाटील, आबाजी मोरे, राजू कोळी, बाबुराव मोरे, अवधूत माने, संजय मोरे, संजय माळी, नितीन मिणचे, दिलीप माने, शंतनू चव्हाण, अक्षय काशीद, निखिल मोरे, निरंजन सूर्यवंशी, शामराव काशीद, उदय आरगे, उत्कर्ष शिरगुप्पे, गौरव गायकवाड, अनिकेत काटकर, बाजीराव कोळी, आदित्य कोळी, आदिराज कोळी, सुशांत आरगे, सूरज आरगे, ओंकार कोळी, अभिषेक पाटील-बारवाडकर, स्वप्नील जगदाळे, संतोष जाधव, बाळकृष्ण माने, प्रकाश कुर्डेकर, अथर्व पाटील, बबन काळे, पारस भाट यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामीभक्त दिंडीत सहभागी झाले.
दिंडी मार्गावर विविध ठिकाणी स्वामीभक्तांच्या स्वागताची तसेच अल्पोपहार व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण प्रवासात स्वामींच्या नामाचा अखंड गजर, भजन, अभंग आणि भक्तिगीतांमुळे वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या चरणी सेवा अर्पण करून अन्नछत्रात स्वयंसेवक म्हणून सेवा बजावणे हेच या दिंडीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
श्रद्धा, सेवा आणि समर्पण यांचा सुंदर संगम असलेली शिरोळची ही पायी दिंडी गेली १७ वर्षे अखंडपणे सुरू असून, स्वामी समर्थांच्या कृपेवर दृढ विश्वास ठेवणाऱ्या भक्तांसाठी ती एक प्रेरणादायी अध्यात्मिक परंपरा बनली आहे. यंदाही उत्साह, शिस्त आणि भक्तिभावाने दिंडीचे प्रस्थान झाल्याने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ या अखंड जयघोषाने शिरोळ नगरी भक्तिमय झाली.