पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
हातकणंगले-तारदाळ मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात पुलाची शिरोली येथील सलिम गुलाब कोतवाल (वय ४८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी अल्पवयीन चालकासह वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.याबाबत आयाज शमशुद्दीन सौदागर (वय ३८, व्यवसाय प्लंबर, रा. माळभाग, हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५ (अ), (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र रामप्रसाद बैगा (वय १७, रा. चव्हाणवाडी, कोरोची, ता. हातकणंगले, मूळ रा. वाघर, ता. देवसार, जि. सिंगरोली, मध्यप्रदेश) हा बजाज कंपनीची सीटी-१०० मोटारसायकल (एमएच-०९-ईएन-५६८६) चालवत होता. श्री स्वामी समर्थ कॉलनीसमोरील हातकणंगले ते तारदाळ रस्त्यावरील आवाडे पार्ककडे जाणाऱ्या वळणावर त्याने भरधाव वेगाने व बेदरकारपणे वाहन चालविले. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलला (एमएच-०९-जीजी-१४१७) जोरदार धडक दिली.या धडकेत हिरो मोटारसायकलचे चालक सलिम गुलाब कोतवाल (रा. माळवाडी, पुलाची शिरोली) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. आरोपी क्रमांक २ साप्येंद्रकुमार ललन यादव (रा. चव्हाणवाडी, कोरोची) याने आरोपी जितेंद्र बैगा हा अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याला स्वतःच्या मालकीचे वाहन चालविण्यास दिले होते. त्यामुळे अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालविण्यास परवानगी दिल्याबद्दल त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अल्पवयीन चालकांकडून होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.पालक व वाहनमालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत, अन्यथा अशा प्रकारच्या गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत.