तरुणाचे अपहरण करून शिरोली, सादळे-मादळे घाटात बेदम मारहाण तरुण कोमात

Spread the love

७ संशयितांसह एका अनोळखीवर गुन्हा दाखल वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद

 पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पेठवडगाव ता हातकणंगले येथील बालाजी पार्क परिसरातून एका तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला शिरोली तसेच सादळे-मादळे घाटात नेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण कोमात गेला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात ७ जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पेठवडगाव व शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी रामचंद्र शंकर जाधव (वय ५७, व्यवसाय-व्यापार, रा. बालाजी पार्क, पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत उबाळे, आदीनाथ नसरिंगे, रोहीत शहाजी सातपुते, प्रताप शिवाजी भोरे, अली तानेखान, विशाल कांबळे, आणि अनिकेत कांबळे (सर्व रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २६ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ३:०० वाजण्याच्या सुमारास घडली. संशयित आरोपींनी बेकायदेशीर टोळी जमवून पेठवडगाव येथील बालाजी पार्क परिसरातील फिर्यादी यांच्या घरी धाड टाकली. तेथे त्यांनी फिर्यादीच्या कुळातील मकानदार यांच्या मुलाची म्हणजेच ऋत्विक याची चौकशी केली. त्यानंतर फिर्यादी व ऋत्विक या दोघांनाही जबर मारहाण करत त्यांच्या कानाखाली लगावली. संशयितांनी फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगा यांचे मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतले.त्यानंतर आरोपींनी ऋत्विक यास जिवे मारण्याच्या उद्देशाने गाडीत घालून त्याचे जबरदस्तीने अपहरण केले. त्याला शिरोली पुलाची आणि सादळे-मादळे घाटात नेऊन बेदम मारहाण केली.या भीषण मारहाणीत ऋत्विक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीची तीव्रता एवढी मोठी होती की तो सध्या कोमात गेला आहे.या घटनेनंतर आरोपींनी फिर्यादीची पत्नी व मुलगी यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपींच्या या दहशतीमुळे भीतीपोटी तक्रार देण्यास विलंब झाल्याचे फिर्यादींनी पोलिसांना सांगितले.या प्रकरणाचा पुढील तपास पेठवडगाव व शिरोली पोलिस करीत आहेत .

Leave a Comment

error: Content is protected !!