शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषद व आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान, शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या “शिरोळभूषण पुरस्कार २०२६” साठी खंडेराव जगदाळे आणि जयसिंगराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील (दादा) यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिल्या.सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषी तसेच विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेत या दोन्ही मान्यवरांची शिरोळभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडून आले आहे. त्यांच्या कार्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला असून अनेक युवक व सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आहे.यावेळी गणपतराव पाटील (दादा) यांनी बोलताना सांगितले की, शिरोळभूषण पुरस्कार हा केवळ सन्मान नसून समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव आहे.खंडेराव जगदाळे आणि जयसिंगराव पाटील यांनी आपल्या कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांचा हा सन्मान संपूर्ण शिरोळ तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.तसेच यावर्षी विशेष सत्कारासाठी निवड झालेल्या प्रवीण चुडमुंगे यांचेही गणपतराव पाटील यांनी अभिनंदन केले. विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही योग्य दखल असून त्यांचा सत्कार हा त्यांच्या कार्याला मिळालेली प्रेरणादायी पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.त्यांच्या पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.शिरोळ तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक वाटचालीत योगदान देणाऱ्या या सर्व मान्यवरांचा गौरव हा तालुक्यासाठी अभिमानास्पद क्षण ठरत आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देत राहील आणि समाजहिताच्या कार्यासाठी अधिकाधिक व्यक्ती पुढे येतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी संचालक दरगु गावडे, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे, अविनाश माने, टिल्लू देसाई, मदन गावडे, संजय सुतार आदी उपस्थित होते.