विकासरत्न आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) : संघर्षातून घडलेले लोकनेतृत्व आणि विकासाचे नवे पर्व ; जनतेच्या विश्वासाचा मानबिंदू

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
अनुकूल परिस्थितीत यश मिळविणारे अनेक असतात;परंतु प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत शून्यातून स्वतःचे विश्व उभे करणारे आणि समाजासाठी आयुष्य समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व मात्र विरळाच असते. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, दलितमित्र, समाजसेवक आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले डॉ. अशोकराव माने (बापू) हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय आणि विकासात्मक कार्याचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांनी राजकारणाला केवळ सत्तेचे माध्यम न मानता समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन बनविले आहे. त्यामुळेच आज ते लाखो जनतेच्या मनातील विश्वासाचे प्रतीक बनले आहेत.
समाजसेवेच्या कार्यातून उभारलेली भक्कम ओळख
डॉ.अशोकराव माने यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात महाराष्ट्रातील थोर स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी आणि जननेते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रेरणेतून केली.युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलने उभारली आणि लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले.युवक अवस्थेपासूनच त्यांनी दुर्बल,वंचित,अपंग,दलित,मागासवर्गीय आणि महिलांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून कार्य सुरू केले.समाजातील उपेक्षित घटकांना आर्थिक बळ मिळावे यासाठी पतसंस्था उभारल्या.अपंग बांधवांसाठी टेलिफोन बूथची सुविधा निर्माण केली.अनेकांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध औद्योगिक संस्था सुरू केल्या.सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा वाढविण्याचा प्रयत्न केला.हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून त्यांनी आपली व्यवस्थापन क्षमता सिद्ध केली.
सामान्य माणसाच्या घरकुलाचे स्वप्न साकार करणारे नेतृत्व
निवारा ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज आहे. सामान्य कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे यासाठी डॉ. माने यांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सहकारी गृहनिर्माण संस्था आणि कृष्णा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून अनेक कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण केले.त्यांनी केवळ घरे दिली नाहीत, तर हजारो कुटुंबांना स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना दिली. त्यामुळेच अनेक कुटुंबे आजही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात.
रोजगारनिर्मितीचा दूरदृष्टीचा विचार
समाजाचा विकास हा रोजगारनिर्मितीशिवाय शक्य नाही याची जाणीव डॉ. माने यांना सुरुवातीपासून होती. महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवकांना कर्ज उपलब्ध करून दिले आणि त्यांना उद्योग-व्यवसायाकडे वळविले.छत्रपती शाहू औद्योगिक वसाहतीची स्थापना करून त्यांनी शेकडो उद्योगांना चालना दिली. या उद्योगांमुळे हजारो युवकांना रोजगार मिळाला. ग्रामीण भागातील युवक शहरांकडे स्थलांतर न करता आपल्या भागातच रोजगार मिळवू लागले.
वस्त्रोद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान
वस्त्रोद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. या क्षेत्रातील संधी ओळखून डॉ. माने यांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी तसेच स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी (इगतपुरी, नाशिक) यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प उभे केले.या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले आणि अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारली.
शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाची अखंड धडपड
शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे या विचारातून त्यांनी चिंचवाड (ता. शिरोळ) येथे हायस्कूल सुरू केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला.मुंबईच्या चेंबूर परिसरात मुक्ताई गृहनिर्माण संस्था स्थापन करून त्यांनी विविध स्तरांवरील लोकांसाठी कार्य सुरू ठेवले.महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी उचललेली पावले विशेष उल्लेखनीय आहेत. कोल्हापूर येथे महिला औद्योगिक वसाहतीचा संकल्प त्यांनी केला आणि तो आज वास्तवात उतरत आहे.
राजकीय प्रवासातील संघर्ष आणि जिद्द
डॉ.अशोकराव माने यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. अनेक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका त्यांनी लढवल्या. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी जनतेशी संवाद वाढविला आणि लोकांचे प्रश्न जवळून समजून घेतले.सन २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळवून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली.
पराभवातून उभारी घेणारा नेता
सन २०१९ मध्ये हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी निवडणूक लढविली. विजय मिळाला नाही; परंतु या पराभवाने त्यांना खचविले नाही.निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी जनतेत मिसळण्यास सुरुवात केली. गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. जनसंपर्क वाढविला. याच पाच वर्षांच्या मेहनतीचे फळ त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळाले.
ऐतिहासिक विजय आणि जनतेचा विश्वास
नोव्हेंबर २०२४ मध्ये हातकणंगले मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवत ऐतिहासिक मतदानाने त्यांना विधानसभेत पाठविले.या विजयामागे त्यांचे कार्य, त्यांची सातत्यपूर्ण लोकसेवा आणि विविध नेत्यांचे मार्गदर्शन होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार विनय कोरे, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना पाठबळ दिले.
सत्तेबाहेर असतानाही विकासाचा ध्यास
२०१९ ते २०२४ या काळात त्यांच्याकडे कोणतेही सत्तापद नव्हते. तरीही त्यांनी मुंबईत शासनस्तरावर पाठपुरावा करून विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करून घेतला.
ही बाब त्यांच्या कार्यशैलीचे वेगळेपण अधोरेखित करते. सत्ता असो वा नसो, विकासासाठी झटणे हेच त्यांचे ध्येय राहिले आहे.
हातकणंगलेच्या विकासाचा व्यापक आराखडा
आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघासाठी दीर्घकालीन विकासाचा आराखडा तयार केला आहे. दरवर्षी येणाऱ्या महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना, तालुका क्रीडा संकुल, आधुनिक आरोग्य संकुल, रस्ते, पाणीपुरवठा आणि शैक्षणिक सुविधा यांना त्यांनी प्राधान्य दिले आहे.हातकणंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
माणगाव येथे राष्ट्रीय स्मारकाचे स्वप्न
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक माणगाव परिषदेचे स्मरण जतन करण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे.हा प्रकल्प केवळ स्मारक नसून सामाजिक न्याय, समता आणि प्रबोधनाच्या विचारांचे राष्ट्रीय केंद्र बनण्याची क्षमता बाळगतो.
महिलांच्या आर्थिक क्रांतीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
सन २०२५-२६ मधील त्यांचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे कोल्हापूर येथे उभी राहत असलेली सावित्रीबाई फुले महिला औद्योगिक संस्था.सुमारे ५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून ५०० महिला उद्योजिका विविध उद्योगांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. महिलांमध्ये उद्योजकता, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण करणारा हा प्रकल्प राज्यासाठी आदर्श ठरणारा आहे.
शेतकऱ्यांच्या सिंचन प्रश्नावर मोठी झेप
हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना वीज आणि पाणी या दोन महत्त्वाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली धुळोबा-अल्लमप्रभू-रामलिंग डोंगर पठार सिंचन योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या या योजनेद्वारे वारणा नदीचे पाणी सायफन पद्धतीने कालव्यांतून आणून १३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले जाणार आहे. यामुळे ३० गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडण्याची अपेक्षा आहे.
विकासकामांचा विक्रमी वेग
आमदार झाल्यानंतरच्या पहिल्याच आर्थिक वर्षात त्यांनी विविध निधींच्या माध्यमातून सुमारे १५० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली.चालू आर्थिक वर्षातही सुमारे १६८ कोटी रुपयांच्या विकासकामांना गती दिली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे.
 क्रीडा क्षेत्रालाही नवी दिशा
पेठवडगाव येथे प्रस्तावित क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागत असून सुमारे ९० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.
 ऐतिहासिक वारशाचे जतन
माणगाव परिषद ही सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना मानली जाते. या परिषदेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या ऐतिहासिक शाळेच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे.इतिहास आणि विकास यांचा समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येतो.
विकास, सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेचा आदर्श
डॉ. अशोकराव माने (बापू) यांचे संपूर्ण सार्वजनिक जीवन पाहिले तर त्यामध्ये विकासाची दृष्टी, सामाजिक बांधिलकी, संघर्षशीलता, जिद्द आणि लोकांप्रती असलेली आत्मीयता स्पष्टपणे दिसून येते.ते केवळ राजकारणी नाहीत, तर समाजाला दिशा देणारे नेतृत्व आहेत. महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांना रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यांसाठी त्यांची धडपड सातत्याने सुरू आहे.
 वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांच्या वाढदिवसानिमित्त हातकणंगले मतदारसंघासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.त्यांनी हाती घेतलेले सर्व विकाससंकल्प यशस्वीपणे पूर्ण व्हावेत, हातकणंगले मतदारसंघ विकासाच्या नव्या शिखरावर पोहोचावा, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड जनसेवेची ऊर्जा लाभावी, हीच सर्व जनतेची मनःपूर्वक सदिच्छा.

Leave a Comment

error: Content is protected !!