शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात दिवसाढवळ्या सुरू असलेला अवैध माती उत्खननाचा धंदा आता रात्रीच्या अंधारातही बिनधास्तपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.महसूल विभागाच्या नाकावर टिचून माती माफियांनी अक्षरशः हैदोस घातला असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले जात असल्याचा संतप्त आरोप नागरिकांतून केला जात आहे.
शिरोळ तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या सहाय्याने अनेक दिवस रात्रीभर मातीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे ज्या कोतवाल,तलाठी,मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार सुरू आहे,त्या अधिकाऱ्यांना याची माहिती नसल्याचे सांगितले जात असल्याने संशय अधिक गडद झाला आहे.त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शिरोळ तालुका हा कर्नाटक, सांगली आणि मिरज परिसरातील माती माफियांसाठी सध्या ‘सॉफ्ट टार्गेट’ बनल्याची चर्चा आहे.अनेक ठिकाणी खासगी जमिनींचा आधार घेत माती उत्खननाची परवानगी घेतली जाते; मात्र त्यानंतर लगतच्या जमिनीतील मातीही चोरून काढली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत.गावातील काही पुढारी आणि दलाल यांच्या संगनमतातून हा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. उत्खननातून काढलेली माती विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांना मोठ्या दराने विकली जात असल्याने या काळ्या व्यवसायातून लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असतानाच पर्यावरणाचाही मोठा ऱ्हास होत आहे.विशेषतः नदीकाठालगत सुरू असलेल्या उत्खननामुळे भविष्यात नदीकाठ उध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान,नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच मोजणी कार्यालयामार्फत उत्खनन क्षेत्राचे मोजमाप करून नेमकी किती माती चोरी झाली आणि शासनाचे किती नुकसान झाले याचा खुलासा करावा,अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे. महसूल विभागाने तातडीने कारवाई करून माती माफियांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा या अवैध उत्खननामुळे शासनासह पर्यावरणाचेही अपरिमित नुकसान होणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.