पुलाची शिरोली / प्रतिनिधी
नागांव (ता. हातकणंगले) येथील संभाजीनगर परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का लागून तीन वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून घरमालकाच्या निष्काळजीपणामुळे हा निष्पाप जीव गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.राजलक्ष्मी प्रताप निशाद (वय ३, मूळ रा. कुडाळ, जि. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे वडील प्रताप निशाद हे शिरोली एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करत असून गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर येथील कृष्णात साळुंखे यांच्या खोलीत भाड्याने राहत होते.रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास राजलक्ष्मी घरासमोर खेळत होती. यावेळी विजेच्या खांबाला आधार देण्यासाठी जमिनीत रोवलेल्या लोखंडी ताण सळीला तिचा हात लागला. त्या सळीत विजेचा प्रवाह उतरल्याने तिला जोरदार करंट बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलीस तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणी आणि पंचनाम्यात धक्कादायक बाबी समोर आल्या. घरमालकाने मीटरचे मेन स्विच थेट (डायरेक्ट) जोडले होते. मीटर पेटी अत्यंत खराब अवस्थेत होती. विजेच्या वायरची योग्य फिटिंग करण्यात आलेली नव्हती. तसेच अर्थिंगची कोणतीही व्यवस्था नव्हती. मेन स्विचमध्ये फ्युजदेखील नसल्याचे स्पष्ट झाले.महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील झाडाझुडपांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता.याबाबत घरमालकाला अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर निष्पाप चिमुरडीला जीव गमवावा लागला. दरम्यान, विजेच्या खांबावरील ताण तारेतून करंट उतरल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र तपासात मीटर पेटीतून बाहेर आलेल्या उघड्या वायरमुळेच ताण सळीत करंट उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणी संबंधित घरमालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.