रामलिंग उपसा सिंचन योजनेला मोठा दिलासा ; सर्वेक्षणासाठी २.१८ कोटींचा निधी मंजूर – आमदार डॉ.अशोकराव माने

Spread the love

आमदार विनय कोरे यांच्या पाठपुराव्याला यश ; शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले तालुक्यांतील १३ हजार हेक्टर क्षेत्राला होणार लाभ

शिरोळ / प्रतिनिधी

जनसुराज्य पक्षाचे नेते,माजी मंत्री तथा शाहुवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनयरावजी कोरे (सावकार) यांच्या सातत्यपूर्ण आणि अथक प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून शाहुवाडी,पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रामलिंग उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण, अन्वेषण आणि संकल्पन कामासाठी तब्बल २ कोटी १८ लाख ६७ हजार २५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.ही माहिती हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले तसेच शिरोळ तालुक्यातील अनेक भाग आजही सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रामलिंग उपसा सिंचन योजना ही या परिसरासाठी जीवनदायी योजना ठरणार असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.वारणा मोठा प्रकल्प, ता. शिराळा, जि. सांगली या प्रकल्पाच्या पाणी वापराच्या सुधारित जलनियोजनास मान्यता मिळाल्यानंतर रामलिंग उपसा सिंचन योजनेसाठी २.२३ अघफूट पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे अंदाजे १३ हजार २० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोरडवाहू भागातील शेतीला नवे बळ मिळणार असून कृषी उत्पादनात मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वारणा नदीवरील खोची, ता. हातकणंगले येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वंचित क्षेत्रासाठी शासकीय खर्चातून ही महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या योजनेस मान्यता प्राप्त झाल्यानंतर आता प्रत्यक्ष सर्वेक्षण व तांत्रिक प्रक्रियेला वेग प्राप्त झाला आहे.रामलिंग उपसा सिंचन योजनेअंतर्गत ८० मीटर उंचीवरील भागात पाणी उचलून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या भागातील ऊस, भात, भाजीपाला तसेच इतर नगदी पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.या योजनेसाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार डॉ. अशोकराव माने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री डॉ. विनय कोरे यांचे विशेष आभार मानले आहेत.

आमदार विनय कोरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या प्रकल्पाला गती मिळाल्याचे बोलले जात आहे. सिंचनाच्या माध्यमातून शेती विकासाला चालना देऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.रामलिंग उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात आल्यास शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला बारमाही पाण्याचा आधार मिळणार असून या भागाच्या कृषी आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!