कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघ आणि महाशिवरात्री कृष्णावेणी माता महाप्रसाद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ जुलै रोजी महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त ऐतिहासिक करतोडणी स्पर्धा आणि ‘कुरुंदवाड भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पार पडणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमासाठी आमदार भास्कर जाधव,आम. सतेज पाटील, आम. डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, आम.अशोकराव माने, माजी खास.राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. करतोडणी स्पर्धेला प्रतिसाद वाढावा यासाठी प्रथम क्रमांक स्प्लेंडर मोटारसायकल, द्वितीय क्रमांक:चांदीची गदा, 5 हजार रोख व सन्मानचिन्ह,तृतीय क्रमांक 3हजार रोख व ढाल,चतुर्थ क्रमांक 2 हजार रोख व ढाल अशी बक्षीशे ठेवण्यात आली आहेत.
तर कुरुंदवाड शहराच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तींचा गौरव ‘कुरुंदवाड भूषण’ पुरस्काराने केला जाणार असून कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब उर्फ दा. आ. पाटील, एस. पी हायस्कुलचे चेअरमन शरद पराडकर, माजी नगरसेवक आप्पासाहेब बंडगर, माजी नागराध्यक्ष चंगेजखान पठाण यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले.
या दिवशी महाराष्ट्र लावणी परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी एक तासाचा खास लावणी शो आयोजित करण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या पत्रकार परिषदेस प्रफुल्ल पाटील, तानाजी आलासे, अर्षद बागवान, महावीर आवळे, राजू बेले यांच्यासह आदी उपस्थित होते.