“शिरोळ शहर नशामुक्तसाठी रणशिंग फुंकले; तरुण पिढी वाचवण्यासाठी निर्णायक लढ्याची नगरसेवक सचिन शिंदे यांची हाक!”

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शहरात वाढत्या नशेच्या विळख्यामुळे तरुण पिढी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असून याविरोधात आता निर्णायक आणि आक्रमक लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक सचिन शिंदे यांनी पुढाकार घेत शिरोळ शहर नशामुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.या पार्श्वभूमीवर शिरोळ नगर परिषदेमध्ये सार्वजनिक मंडळे,शाळा,महाविद्यालये,पोलीस,डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.मात्र, शहराच्या भवितव्याशी संबंधित एवढ्या गंभीर विषयावर केवळ चार ते पाच नगरसेवक उपस्थित राहिल्याने संतापाची लाट उसळली आहे.लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळे “खरंच शिरोळ नशामुक्त होणार का?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.बैठकीत नगरसेवक सचिन शिंदे यांनी शहरातील वाढत्या गांजाच्या प्रमाणावर थेट प्रकाश टाकत धक्कादायक वास्तव मांडले. तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहेत.काही महिन्यांपूर्वी नशेमुळे एका तरुणाचा खून झाला ही घटना संपूर्ण समाजासाठी इशारा आहे,असे ते म्हणाले.त्यांनी स्पष्ट केले की,केवळ रस्ते,गटारी, पाणी,लाईट या विकासकामांचा दिखावा करून उपयोग नाही.जर तरुण पिढीच नष्ट होत असेल, तर हा विकास निरर्थक आहे.नशामुक्त तरुण पिढी हाच खरा विकास आहे. उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी या भूमिकेला ठाम पाठिंबा देत शिरोळ शहरातून गांजा,गुटखा आणि देशी दारू शोधून काढून हद्दपार करण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल.ही लढाई अर्धवट राहणार नाही, असा इशारा दिला.त्यांनी नगराध्यक्षा योगीता कांबळे व सर्व नगरसेवकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करत या मोहिमेला अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.दरम्यान,या महत्त्वाच्या बैठकीकडे आरोग्य सभापती विजय आरगे यांनी पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.पालक,महिला व ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तरुण पिढी वाचवण्याचा प्रश्न असताना जबाबदार व्यक्ती गैरहजर राहते, हे अत्यंत निष्काळजीपणाचे लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया दिली.यामुळे काही लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या बैठकीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत नशाविरोधी लढ्यासाठी एकजूट दर्शवली.स्पंदन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.विशाल चौगुले,डॉ.अंगराज माने, ॲड.सुरज माने, व्यसनमुक्ती कार्यकर्ते नामदेव माने,माजी नगरसेवक पंडित काळे,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य खंडेराव हेरवाडे, प्रा.अमर माने तसेच नगरसेवक राहुल कोळी, मुख्याधिकारी, यांनी शिरोळ नशामुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.शिरोळ शहर नशाविरोधी लढा प्रभावी करण्यासाठी पालक,शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती, पोलिसांची कडक कारवाई,डॉक्टरांकडून समुपदेशन आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज शिरोळसमोर उभा ठाकलेला हा प्रश्न केवळ सामाजिक नाही, तर संपूर्ण पिढीच्या अस्तित्वाचा आहे.त्यामुळे आता केवळ चर्चा नव्हे, तर ठोस आणि तातडीची कृती हवी.अन्यथा नशेच्या अंधारात हरवणाऱ्या तरुणांना वाचवणे अशक्य होईल.तरुण पिढी वाचवायचे असेल, तर नशेविरोधात एकजूट होऊन निर्णायक लढा उभारणे हाच एकमेव पर्याय आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!