टाकळीवाडीचा सुपुत्र जवान रोहित खणीकुडे जम्मू काश्मीरमध्ये शहीद 

Spread the love

टाकळीवाडी / प्रतिनिधी 

देशसेवेसाठी जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना टाकळीवाडी गावचे सुपुत्र जवान रोहित परशुराम खणीकुडे शहीद झाल्याची हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तर आहेतच, पण त्याचबरोबर त्यांच्या शौर्याबद्दल अपार अभिमानही व्यक्त होत आहे. जवान रोहित खणीकुडे हे भारतीय सैन्यात कार्यरत होते.देशाच्या सीमांचे रक्षण करताना त्यांनी आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा गाठली आणि अखेर प्राणांची आहुती देत मातृभूमीची सेवा केली. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच वातावरण भावूक झाले.नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकरी त्यांच्या आठवणींनी व्याकुळ झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.जवान रोहित यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला असला तरी गावकऱ्यांनी त्यांना धीर देत त्यांच्या बलिदानाचा अभिमान व्यक्त केला आहे.रोहितसारखा शूर पुत्र आमच्या गावात जन्माला आला,ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.जवान शहीद रोहित खणीकुडे यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यांच्या या बलिदानाची गाथा कायम स्मरणात राहील आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील,अशा भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!