जयसिंगपूर येथे ८ व्या राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
जयसिंगपूर / प्रतिनिधी
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी, शेतीतील नवनविन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पन्नात वाढ कशी होईल,या दृष्टीने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन प्रामुख्याने करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्याबरोबर सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळावी त्या दृष्टीने विविध स्टॉलही उभारण्यात आले आहेत, त्यामुळे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
सहकाररत्न स्व. शामरावआण्णा पाटील (यड्रावकर) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमदार मा. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी साखर कारखाना नरंदे, शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य ८ वे शरद राज्यस्त कृषी व पशु पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते.
प्रारंभी सहकाररत्न स्व. शामरावआण्णा पाटील (यड्रावकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी केले. यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, गेल्या आठ वर्षांपूर्वी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक माहिती मिळवण्यासाठी बारामती सारख्या शहरात कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जावे लागत होते. शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक माहिती व त्यांच्या उत्पन्नात कशा पद्धतीने वाढ होईल या दृष्टीने शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. हे कृषी प्रदर्शन फक्त शेतकऱ्यांपुरतेच मर्यादित न राहता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून सार्वजनिक महोत्सव साजरा होत आहे. शेती विभागातील आधुनिक तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांच्या बरोबर सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळावी त्या दृष्टीने यावर्षी पहिल्यांदाच महसूल विभाग, कृषी विभाग, पशुधन विभाग, महावितरण विभाग, पंचायत समिती आधी शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी सर्वांना मिळावी यासाठी स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बरोबर सर्वसामान्यांच्या अडचणी एकत्रितपणे सोडवल्या जातील. शेतकऱ्यांनी शासनाच्या क्षारपड पायलट प्रोजेक्टचा लाभ घ्यावा, यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या वतीने ८० टक्के शासन देणार असून २० टक्के शेतकरी वर्गाला रक्कम भरावी लागणार असून याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. ३ फेब्रुवारी पर्यंत या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी बोलताना हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यड्रावकर उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी सर्वसामान्यांना नागरिकांना माहिती उपलब्ध करून त्यांची उन्नती साधण्याचे काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे. स्वर्गीय रत्नापाण्णा कुंभार व स्वर्गीय शामरावअण्णा पाटील यड्रावकर त्यांच्यामुळे शिरोळ तालुका हा सुजलाम् सुफलाम् झाला आहे. येथील शेतकरी देखील सक्षम व्हावा त्या दृष्टीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सदरचे कृषी प्रदर्शन आयोजित करून शेतकऱ्यांना बळकट करण्याचे काम करीत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध अडी – अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणींसाठी आम्ही दोन्ही आमदार शेतकऱ्यांच्या बरोबर कायम राहू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कृष्णराज महाडिक, सावकर मादनाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचगंगेचे चेअरमन पी.एम. पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, रामचंद्र डांगे, छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील, प्रताप उर्फ बाबा पाटील, रणजीत पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, सुकुमार किणिंगे, सुभाषसिंह रजपूत, शैलेश आडके, धनाजीराव जगदाळे, डॉ. दशरथ काळे, विद्याधर कुलकर्णी, विद्याधर मरजे, बाबगोंडा पाटील, चंद्रकांत जोंग, बबन चौगुले, सुरेंद्र जंगम, नंदकुमार पाटील, उदय डांगे, दिग्विजय माने, पाटबंधारे पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर, अभियंता संजय यळगुडे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, कृषी सहसंचालक उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर, महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल, विभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांच्यासह शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी सर्व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संजय नांदणे यांनी मानले.