दत्तवाड-मलिकवाड आंतरराज्य बंधारा सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला

Spread the love

हुक्केरी पितापुत्रांच्या पाठपुराव्याने ४ कोटींच्या कामाला यश; अवघ्या सहा महिन्यांत पूर्णत्व

मलिकवाड / प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या दूधगंगा नदीवरील दत्तवाड-मलिकवाड आंतरराज्य बंधाऱ्याचे पुनर्बांधणी व मजबुतीकरणाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून येत्या सोमवारपासून हा बंधारा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे सीमाभागातील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.या बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करत कामाला वेग दिला. सामान्यतः अशा प्रकारच्या प्रकल्पांना बराच कालावधी लागतो; मात्र संबंधित विभाग आणि ठेकेदार यांच्या समन्वयातून हे काम अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात आले.दत्तवाड, मलिकवाड, सदलगा, नेज, नागराळ, वडगोळ, याद्यानवाडी आणि नणदी परिसरातील नागरिकांसाठी हा बंधारा दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा आहे. नवीन संरचनेमुळे वाहतुकीची सुरक्षितता वाढणार असून पाणी साठवणुकीची क्षमता देखील अधिक मजबूत होणार आहे.सोमवारपासून वाहतूक सुरू होत असल्याने दोन्ही राज्यांतील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी लांबचा वळसा घालण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे वेळ, इंधन आणि खर्चाची बचत होणार असून स्थानिक व्यापारालाही चालना मिळणार आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून या बंधाऱ्याच्या कामाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले आहे. तसेच हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रकाश हुक्केरी आणि गणेश हुक्केरी यांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!