महावितरणच्या मनमानीचा कळस! शिरढोण-टाकवडेतील संतप्त शेतकऱ्यांनी घातला घेराव

Spread the love

शिरढोण / प्रतिनिधी

पंचगंगा नदीकाठावरील शिरढोण आणि टाकवडे परिसरातील शेतकऱ्यांच्या संयमाचा अखेर बांध फुटला असून महावितरणच्या विस्कळीत वीजपुरवठ्याविरोधात शनिवारी रात्री उशिरा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत तीव्र संताप व्यक्त केला. पावसाअभावी आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे दुहेरी फटका बसत आहे.प्रशासनाने पिकांना जीवदान मिळावे म्हणून तीन दिवसांची पाणी उपसा बंदी शिथिल केली असली, तरी प्रत्यक्षात अखंडित वीजपुरवठाच मिळत नसल्याने हा निर्णय कागदावरच राहिल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. उपसा बंदी उठवल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी अवघ्या आठ तासांत अनेकवेळा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी नदीतून पाणी उपसा करण्याची यंत्रणा ठप्प झाली आणि पिकांना पाणी देण्याचे नियोजन कोलमडले.वारंवारच्या ट्रिपिंगमुळे मोटारी, स्टार्टर आणि अन्य विद्युत उपकरणे नादुरुस्त होत असून शेतकऱ्यांच्या खिशाला हजारो रुपयांचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा का खंडित केला जात आहे, याबाबत विचारणा केल्यास महावितरणचे कर्मचारी केवळ “वरील आदेश आहेत” असे उत्तर देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नेमके आदेश कोणाचे आणि जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 20 जून रोजी रात्री अकराच्या सुमारास शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत घेराव घातला. वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, ट्रिपिंग थांबवावे आणि नादुरुस्त यंत्रणेची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे, मनोजकुमार चौगुले, बाबासो हेरवाडे, सुशांत चौगुले, बाळासो कोळी, जग्गू बिरोजे,विजय मगदूम,अरुण काळे,रिंकू गुरव, विजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, महावितरणच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!