तेरवाडच्या सरपंच पौर्णिमा गोंधळी यांना राज्यस्तरीय ‘ग्रामसमृद्धी सन्मान’

Spread the love
ग्रामीण विकासातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
हेरवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील तेरवाड गावच्या कर्तबगार व लोकाभिमुख सरपंच सौ. पौर्णिमा संतोष गोंधळी यांना ग्रामीण विकास आणि ग्रामपंचायत प्रशासनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय ग्रामसमृद्धी सन्मान २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवनात नालंदा संस्थेच्या ‘ग्रामसमृद्धी मंच’तर्फे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी आणि समाजसेवकांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय खाद्य निगम (एफसीआय)चे संचालक प्रा. सचिन रामभाऊ जायभाये होते. तसेच एआरजे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन जितेंद्र तुळशीराम दाते आणि शब्दधन फाउंडेशनचे अध्यक्ष, ख्यातनाम लेखक व व्याख्याते मनोज शिवाजी वाबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी प्रा. जायभाये यांनी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हेच खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाचे शिल्पकार असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “गावपातळीवर काम करणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचत आहे,” असे ते म्हणाले.तेरवाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे, लोकहिताचे उपक्रम आणि ग्रामस्थांशी सातत्याने संवाद साधत प्रभावी नेतृत्व करणाऱ्या सरपंच सौ. पौर्णिमा गोंधळी यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान तेरवाडच्या ग्रामस्थांचा असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.याप्रसंगी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय अनुसे, राजू गोंधळी, संतोष गोंधळी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमात बोलताना जितेंद्र दाते यांनी ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देण्याची आवश्यकता अधोरेखित केली, तर मनोज वाबळे यांनी ग्रामीण समाजकार्यातील योगदानाचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. ग्रामीण भागातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.सौ.पौर्णिमा गोंधळी यांना प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे तेरवाड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण विकासासाठी केलेल्या त्यांच्या समर्पित कार्याला मिळालेली ही राज्यस्तरीय पावती असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!