बेपत्ता तरुणाचा विहिरीत निर्घृण खून तोंडात कापड कोंबून डोक्यात वार

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात कारणावरून तोंडात कापड कोंबून आणि डोक्यात पाठीमागून हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका शेतातील विहिरीत फेकून देण्यात आला होता . याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत व्यक्तीचे नाव फिरोज खानसो मुजावर (वय ४४, रा. महाजन कॉलनी, एचएमटी फाट्या जवळ, नागाव, ता. हातकणंगले) असे असून फिरोज मुजावर हा १० मिनिटांत येतो असे घरात सांगून बाहेर पडले होते. मात्र, ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पण सोमवारी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास शिरोली येथील वसंत पाटील यांच्या घोल नावाच्या शेतातील विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना बोलावण्यात आले असता, तो मृतदेह फिरोज मुजावर यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. फिरोज याचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फिरोज मुजावर यांच्या तोंडात कापड कोंबले आणि त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे धारदार किंवा जड हत्याराने जोरदार वार करून त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत विहिरीत आणून टाकून दिले.घटनास्थळी करवीर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पुरावे आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.मृत फिरोज मुजावर यांच्या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच संशयित व्यक्तींची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या खुनाचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!