नागरी सुविधांसाठी शासनाकडे २० कोटींचा प्रस्ताव; कन्यागत २०२८ अनुषंगाने २०० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी
शिरोळ / प्रतिनिधी
चुकीच्या कर आकारणीमुळे नागरिकांकडून करभरणा अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने शिरोळ नगरपालिकेची आर्थिक स्थिती अडचणीत आली असून शहरातील नागरी सेवा व मूलभूत सुविधा पुरविणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर शहर विकासासाठी शासनाकडे सुमारे २० कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिरोळ नगरपालिकेच्या मासिक सभेत घेण्यात आला. याचबरोबर आगामी कन्यागत महापर्व २०२८ च्या अनुषंगाने विविध विभागांच्या समन्वयातून तब्बल २०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा आराखडा तयार करण्यासही सभेत मंजुरी देण्यात आली.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या कै.दिनकररावजी यादव सभागृहात मासिक सभा पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे होत्या. प्रारंभी शहरातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच शैक्षणिक,सामाजिक, क्रीडा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.त्यानंतर उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी विषयवार सविस्तर माहिती देत महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती सभागृहासमोर मांडली.उपनगराध्यक्ष यादव म्हणाले की, शहरात पूर्वी चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यात आल्याने अनेक नागरिकांचा करप्रणालीवरील विश्वास कमी झाला असून कर वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे.त्यामुळे पालिकेला आवश्यक महसूल मिळत नसल्याने पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती यांसारख्या नागरी सेवा पुरविताना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाकडे २० कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक सहाय्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सभेत प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत कल्लेश्वर तलाव परिसराचे सुशोभीकरण, पर्यटनवृद्धी आणि इतर विकासकामांसाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच कन्यागत महापर्व २०२८ लक्षात घेऊन राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यटन आणि सार्वजनिक सुविधा यांसाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन केंद्र तातडीने सुरू करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. शहरात सध्या ३६ अंगणवाड्या कार्यरत असून काही इमारती भाडे तत्वावर आहेत तर अनेक इमारतींची अवस्था जीर्ण झाली आहे. या सर्व अंगणवाड्यांचा सर्वे करून नादुरुस्त इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सभेत एकमताने घेण्यात आला.नागरिकांच्या कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी पाणीटंचाईच्या काळात टँकरची आवश्यकता भासत असल्याने पालिकेमार्फत दोन हजार लिटर क्षमतेचे दोन स्टील पाण्याचे टँकर खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच पालिकेकडील जुनी व नादुरुस्त घंटागाडी, ट्रॅक्टर आणि मैल टँकर यांचा लिलाव करण्याचाही निर्णय घेण्यात आला.घालवाड येथील जॅकवेलमधील गाळ काढण्याचा प्रश्न पावसाळ्यानंतर हाताळण्याचे निश्चित करण्यात आले.शहरात बांधकाम परवान्यांबाबत विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने गुंठेवारी नियमितीकरण प्रस्ताव सादर करण्यासाठी नागरिकांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.नगरसेवक दीपक भाट यांनी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत अदा करण्याबाबत सूचना मांडल्या.तर विजय आरगे यांनी पालिकेच्या दैनंदिन खर्चाची बिले तातडीने अदा करण्याची मागणी केली.यावेळी नगरसेवक विजय आरगे, शरद मोरे, दीपक भाट, ओंकार गावडे, उल्हास आवळे, राहुल कोळी, अमरसिंह पाटील,अमर शिंदे,सचिन शिंदे,निलेश गावडे तसेच नगरसेविका विदुला यादव,सविता पुजारी, रेखा कोरे, कल्पना काळे, अनिता संकपाळ, सुवर्णा कांबळे, अनुराधा गुरव, दिपाली फल्ले, श्वेता जाधव, शिवानी कांबळे यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यावरण मंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव
प्रादेशिक पर्यटन योजनेतून कल्लेश्वर तलावासाठी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले.तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयामार्फत राज्यस्तरीय संवर्धन योजनेतून ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो उद्यान’साठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठरावही सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.