दुर्ग संवर्धनासाठी आसमा कुरणेची ऐतिहासिक दौड शिवकालीन १२ किल्ल्यांच्या भेट मोहिमेचा पन्हाळगडावर समारोप

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचावा आणि युवकांमध्ये दुर्ग संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने कोल्हापूरची धावपटू आसमा कुरणे हिने सुरू केलेल्या ऐतिहासिक धाव मोहिमेचा गुरुवार, दि. २८ मे रोजी पन्हाळगडावर समारोप होत आहे. तब्बल ३५०० किलोमीटरचा प्रवास धावत पूर्ण करून शिवकालीन १२ किल्ल्यांना भेट देण्याचा निर्धार तिने यशस्वीपणे पूर्णत्वास नेला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या शिवकालीन किल्ल्यांविषयी जनजागृती व्हावी, दुर्ग संवर्धनाचे महत्त्व युवकांना समजावे आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा अभिमान प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावा, या उद्देशाने आसमाने ही अनोखी मोहीम हाती घेतली होती.दि.१३ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. ही मोहीम ६० दिवसांत पूर्ण करण्याचे ध्येय अस्माने ठेवले होते. मात्र, मोहिमेदरम्यान आलेल्या गंभीर अडचणींमुळे हा कालावधी वाढला. शिवनेरी किल्ल्याच्या प्रवासादरम्यान आसमाला टायफॉईडची लागण झाली होती. आसमा ची प्रकृती खालवल्याने डॉक्टरांनी तिला मोहीम थांबवण्याचा सल्ला दिला होता.मात्र, संकटांपुढे हार न मानणाऱ्या आसमाने जिद्द कायम ठेवली. जुन्नर येथील विनायक खोत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तब्बल दोन महिने तिची सेवा करून तिला मानसिक आणि शारीरिक आधार दिला. प्रकृतीत सुधारणा होताच आसमाने पुन्हा नव्या जोमाने धावण्यास सुरुवात केली आणि अखेर आपल्या स्वप्नाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली.सध्या आसमा प्रतापगड ते पन्हाळा या अंतिम २२६ किलोमीटरच्या टप्प्यावर धावत आहे. या प्रवासामध्ये प्रतापगड ते मेढा ५० कि.मी., मेढा ते सातारा २५ कि.मी., सातारा ते कराड ५४ कि.मी., कराड ते इस्लामपूर ३० कि.मी., इस्लामपूर ते कोल्हापूर ४६ कि.मी. असा टप्प्याटप्प्याने प्रवास पूर्ण करण्यात आला. गुरुवार, दि. २८ मे रोजी कोल्हापूर ते पन्हाळा हा अंतिम २१ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मोहिमेचा समारोप होत आहे.

 आसमाने दिल्या भेटी या गडकिल्ल्यांना

आसमाने आपल्या या ऐतिहासिक प्रवासात सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग,विजयदुर्ग, रायगड,लोहगड, शिवनेरी, साल्हेर, खांदेरी, प्रतापगड आणि पन्हाळा अशा शिवकालीन किल्ल्यांना भेटी दिल्या. प्रत्येक किल्ल्यावर जाऊन तिने दुर्ग संवर्धनाचा संदेश दिला. तिच्या या साहसी मोहिमेमुळे युवकांमध्ये फिटनेस, चिकाटी आणि इतिहासाबद्दल अभिमान निर्माण झाला असून, दुर्ग संवर्धनाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

आसमाच्या या धाडसी मोहिमेची प्रशासनाने घेतली दखल 

तिच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यसेवेसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष निर्देश दिले होते.संपूर्ण प्रवासादरम्यान वैद्यकीय सेवा आणि सुरक्षा यांची विशेष काळजी घेण्यात आली.पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि टोप उपकेंद्राची विशेष वैद्यकीय टीम या मोहिमेत किणी टोलनाक येथून सतत तिच्यासोबत कार्यरत होती. यामध्ये डॉ. जेसिका अँड्र्यूज, डॉ. राजेश्वरी दाबडे, विनोद जाधव, किरण कारंडे, सागर पोळ, रूपाली पांडे, कोमल कांबळे यांच्यासह आरोग्यसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच रुग्णवाहिका चालक सरदार पाटील, सुनील यादव, शुभम पाटील आणि मयुरी टकले यांनीही अहोरात्र सेवा देत आसमाच्या मोहिमेला मोलाचे सहकार्य केले.कोल्हापूरच्या सोमवार पेठेतील अवघ्या २८ वर्षीय आसमा कुरणे हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि धैर्याच्या बळावर ही ऐतिहासिक मोहीम यशस्वी करून दाखवली आहे. संकटांवर मात करत तिने महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि दुर्ग संस्कृतीला नवा उजाळा दिला आहे. तिच्या या कार्यामुळे ती आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.पन्हाळगडावर होणाऱ्या समारोप सोहळ्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि नागरिकांकडून आसमावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!