शिरोळ / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपस्थित राहून विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांनी गोवा येथे सदिच्छा भेट घेत सत्कार करून आभार व्यक्त केले. निवडणूक काळात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली होती.त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला मोठी ताकद मिळाली आणि विजयामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला.या पार्श्वभूमीवर आमदार डॉ.अशोकराव माने यांनी गोवा येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत आत्मीयतेच्या वातावरणात चर्चा पार पडली.यानंतर मतदारसंघातील विविध सामाजिक, राजकीय तसेच औद्योगिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारसंघाच्या विकासासाठी विविध योजनांबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.औद्योगिक प्रगती, रोजगारनिर्मिती, युवकांना संधी उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक विकासाच्या विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मार्गदर्शन केले. भविष्यातही असेच प्रेम, सहकार्य आणि पाठबळ कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमदार डॉ. अशोकराव माने यांना दिली. या भेटीमुळे दोन्ही राज्यांतील सामाजिक व विकासात्मक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.यावेळी आमदार डॉ.अशोकराव माने यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसादभाऊ खोबरे, उद्योगपती राजेंद्र हुपरे, उद्योगपती महेश फडतारे आदी उपस्थित होते.या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.