शिरोळभूषण पुरस्काराने कर्तृत्ववानांचा होणार गौरव – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

जयसिंगराव पाटील, खंडेराव जगदाळे यांना प्रतिष्ठानचा सन्मान; प्रवीण चुडमुंगे यांचाही विशेष गौरव

शिरोळ / प्रतिनिधी 

आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिरोळभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून यंदाच्या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले निवृत्त पोलीस उपअधीक्षक जयसिंगराव पाटील तसेच शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे न्यू इंग्लिश स्कूल, मौजे आगरचे मुख्याध्यापक आणि विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव शिवाजीराव जगदाळे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा “शिरोळभूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच सामाजिक आणि संघटनात्मक कार्याबद्दल शिवप्रतिष्ठानचे शिरोळ तालुका अध्यक्ष प्रवीण शिवाजी चुडमुंगे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.आमदार डॉ. अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान आणि शिरोळ नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १ जून रोजी शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड पुरस्कार समितीमार्फत करण्यात आली आहे. समाजसेवा, शिक्षण, प्रशासन आणि संघटनात्मक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा या पुरस्कारामुळे अधिक दृढ झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.निवृत्त पोलीस उपअधीक्षक जयसिंगराव पाटील यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली. जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली आहे. दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे खंडेराव जगदाळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी संघर्ष केला आहे.तसेच शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जाणीवा जागृत ठेवण्यासाठी कार्यरत असलेले प्रवीण शिवाजी चुडमुंगे यांना विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक असून पुरस्कारार्थींना कोल्हापुरी फेटा,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ आणि रोख ११ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.पुरस्कार सोहळ्यासह यंदा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही विशेष मेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “राजा शिवछत्रपती” हे भव्य महानाट्य यावेळी सादर करण्यात येणार असून या कार्यक्रमामुळे ऐतिहासिक प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होणार आहे.तसेच जय भवानी चौक ते समारंभ स्थळापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि आमदार डॉ. विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास आजी-माजी लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून शिरोळ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने-देशमुख, अविनाश उर्फ पांडुरंग माने, बजरंग काळे, विजयसिंह माने-देशमुख, बी. जी. माने, एन. वाय. जाधव, बबन बन्ने, सागर कोळी, सुहास राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते.समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य शिरोळभूषण पुरस्काराच्या माध्यमातून सातत्याने होत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!