कोल्हापूर / प्रतिनिधी
आमदार चंद्रदीप नरके यांनी आज राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन शेतकरी व साखर उद्योगाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी ऊसतोडणी व शेतकरी वाहतूक कंत्राटदार तसेच साखर कारखान्यांमध्ये वेतनावर कार्यरत असलेल्या शेतकरी-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.
आमदार नरके यांनी सांगितले की, केवळ आयकर विवरणपत्र (ITR) दाखल केल्यामुळे, पॅन क्रमांकावर नाममात्र टीडीएस (TDS) दिसल्यामुळे किंवा टीडीएसचा परतावा मागितल्यामुळे राज्यातील हजारो अल्पभूधारक शेतकरी बांधवांना ‘आयकरदाता’ म्हणून वर्गीकृत केले जात आहे. परिणामी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, शेतकरी कर्जमुक्ती योजना, मोफत वीज योजना आदी विविध शेतकरी कल्याणकारी योजनांपासून हे शेतकरी वंचित राहत असल्याची गंभीर बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
ही परिस्थिती अन्यायकारक असून, प्रत्यक्षात शेतीवर अवलंबून असलेल्या आणि अल्प उत्पन्न असलेल्या शेतकरी-कर्मचाऱ्यांना केवळ तांत्रिक कारणांमुळे योजनांपासून दूर ठेवणे योग्य नसल्याचे आमदार नरके यांनी स्पष्ट केले. संबंधित निकषांचा फेरविचार करून अशा पात्र लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे सर्व शेतकरी कल्याणकारी योजनांचा अखंड लाभ मिळावा, यासाठी शासनाने तातडीने आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.
यावेळी सहकार मंत्र्यांनी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित बाबींचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या भेटीप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते. शेतकरी-कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मांडण्यात आलेल्या या मागणीमुळे संबंधित घटकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शासनाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.