कुरुंदवाड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन,अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने राष्ट्र सेवा मंडळ, कुरुंदवाडतर्फे अखिल भारतीय निमंत्रित पुरुष व राज्यस्तरीय निमंत्रित महिला प्रो कबड्डी स्पर्धेचे 1 मे ते 4 मे अखेर तबक मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश, काश्मीर, हिमाचल प्रदेश, कर्नाटक,हरियाणा,दिल्ली आणि महाराष्ट्रासह देशभरातील 16 संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या स्पर्धा स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील चषक (पुरुष गट) आणि स्व.आक्काताई जिनगोंडा पाटील चषक (महिला गट) या नावाने खेळवली जाणार असून, ती कुरुंदवाड येथील चंदुकाका सराफ ज्वेलर्स क्रीडानगरी येथे दिमाखात होणार असल्याची माहिती राष्ट्र सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जवाहर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना कार्याध्यक्ष पाटील म्हणाले या स्पर्धेद्वारे नवोदित खेळाडूंना प्रो-कबड्डीमध्ये चमकण्याची मोठी संधी मिळणार असून, ग्रामीण भागातील कबड्डी संस्कृतीला एक नवा उभारी मिळणार आहे.या स्पर्धा विद्युत झोतात रात्रीच्या सत्रात 2 क्रीडांगणावर पार पडणार आहेत.
पुरुष स्पर्धेतील प्रथम बक्षिस 1 लाख 51 हजार,द्वितीय क्रमांक 1 लाख,तृतीय क्रमांक 75 हजार महिला स्पर्धेतील प्रथम क्रमांक 51 हजार,द्वितीय क्रमांक 31 हजार,तृतीय क्रमांक 22 हजार तसेच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ पकड, सर्वोत्कृष्ठ चढाई व सर्वोत्कृष्ठ खेळाडू अशी विशेष पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत.प्रो-कबड्डीचे खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील,जवाहर पाटील,गणपतराव सावगावे,बाबासाहेब सावगावे,प्रा.आण्णासाहेब माने-गावडे,प्रकाश मोहिते, शरद आलासे,सुनील कांबळे,शरद तावदारे,उदय चव्हाण मोहन मोहिते,रमेश भेंडीगरे,आशिष मगदूम आदी उपस्थित होते.