पुलाची शिरोलीत शिवप्रभू दौडीने दुर्गामाता दौडीचा प्रारंभ,भगवा ध्वज आणि भवानी तलवारीचा मान मिळविण्यासाठी शिवप्रभू दौड उत्साहात
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १० ऑक्टोबर २०२६) शिरोली येथे शिवप्रभू दौडीचे आयोजन करण्यात आले. या दौडीच्या माध्यमातून यंदाच्या दुर्गामाता दौडीतील भगवा ध्वज आणि भवानी तलवारीचा मानकरी निश्चित करण्यात आला. देव, देश आणि धर्माप्रती निष्ठा व्यक्त करणाऱ्या या दौडीमुळे शिरोली परिसरात धार्मिक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी घटस्थापनेपासून विजयादशमी अर्थात दसऱ्यापर्यंत दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी या कालावधीत दररोज सकाळी सहा वाजता दौडीला सुरुवात होते. दौडीमध्ये भगवा ध्वज आणि भवानी तलवार धारण करण्याचा मान मिळविण्यासाठी शिवप्रभू दौडीचे आयोजन केले जाते. यामध्ये एक ते नऊ असे क्रमांक निश्चित करून मानकऱ्यांची निवड केली जाते.
दौडीमध्ये भगवा ध्वजाचा मानकरी आणि भवानी तलवार धारण करणारा मानकरी अग्रभागी असतो. त्यांच्या मागून धारकरी आणि शिवभक्त देव, देश व धर्म यांची प्रेरणादायी गीते गात दुर्गामाता दौडीत सहभागी होतात. भगव्या ध्वजाच्या साक्षीने निघणारी ही दौड हिंदू संस्कृती, परंपरा, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी ठरते.
शिरोलीमध्ये गेल्या ४० वर्षांपासून आदरणीय ह.भ.प. विठ्ठल तात्या पाटील आणि सुरेशराव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गामाता दौडीचे नियोजन केले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून ही परंपरा सातत्याने जपली जात असून, नव्या पिढीमध्ये देव, देश आणि धर्माविषयी श्रद्धा, अभिमान आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे.
शनिवारी झालेल्या शिवप्रभू दौडीने शिरोलीतील दुर्गामाता दौडीच्या नियोजनाला सुरुवात झाली. यावेळी २०२६ मधील मानकऱ्यांची निवड करण्यात आली.
आगामी दुर्गामाता दौड उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी शिवभक्त आणि धारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. चार दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने आणि राष्ट्रनिष्ठेच्या भावनेने पुढे नेली जात आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान पुलाची शिरोली यांच्यावतीने आव्हान करण्यात येत आहे की घटस्थापने पासून दसऱ्यापर्यंत होणाऱ्या दुर्गामाता दौड मध्ये शिवभक्तांनी सहभागी होऊन देव देश धर्माविषयी श्रद्धा निर्माण करण्याचे आव्हान करण्यात आले आहे