तेरवाड येथे भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जण गंभीर, भरधाव डंपरची तीन मोटारसायकलींना मागून जोरदार धडक; चालकाचा घटनास्थळावरून पलायन

Spread the love

तेरवाड येथे भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जण गंभीर, भरधाव डंपरची तीन मोटारसायकलींना मागून जोरदार धडक; चालकाचा घटनास्थळावरून पलायन

तेरवाड / प्रतिनिधी

हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने तेरवाड येथील रसवंती गृहाजवळ पुढे जाणाऱ्या तीन मोटारसायकलींना मागून जोरदार धडक दिल्याने गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिलेसह दोन पुरुषांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर डंपर चालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेरवाड येथून एक डंपर भरधाव वेगाने कुरुंदवाडच्या दिशेने निघाला होता. तेरवाड येथील रसवंती गृहाजवळ डंपरने पुढे जाणाऱ्या तीन मोटारसायकलींना अचानक मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलींचा चक्काचूर झाला असून त्यावरील काही जण अक्षरशः रस्त्यावर फेकले गेले. या दुर्घटनेत एका महिलेसह दोन पुरुषांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, धडकेनंतर डंपरवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. डंपर रस्त्यालगत असलेल्या बॅरिकेडला धडकून पुढे लगतच्या शेतात जाऊन थांबला. अपघात होताच चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती मिळाली.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून तसेच घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून, मृतांची व जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या अपघाताचे नेमके कारण काय, डंपरचा वेग किती होता आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली का, याचा तपास पोलीस करीत आहेत. पसार झालेल्या डंपर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या भीषण दुर्घटनेमुळे तेरवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!