गोकुळ निवडणुकीसाठी विश्वासराव इंगवले यांच्या उमेदवारीचा ठराव हातकणंगले-शिरोळच्या ठरावधारकांची फार्महाऊसवर बैठक; सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला एकमुखी पाठिंबा
हातकणंगले / प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असतानाच हातकणंगले-शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. मा. संचालक विश्वासराव इंगवले यांच्या फार्महाऊसवर हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बहुतांश ठरावधारकांची बैठक झाली. या बैठकीत सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळची निवडणूक लढविण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच इंगवले यांना उमेदवारी मिळावी, यासाठी सतेज पाटील यांच्याकडे ठरावधारकांच्या वतीने मागणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
गोकुळच्या उमेदवारीसाठी विश्वासराव इंगवले यांनी यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून महायुतीकडे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. अखेरपर्यंत उमेदवारीची आशा कायम ठेवून त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. मात्र, महायुतीच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत अपेक्षित संधी मिळू शकली नाही, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
या पार्श्वभूमीवर इंगवले समर्थक ठरावधारकांनी आता आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. इंगवले यांना उमेदवारी मिळाल्यास हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील ठरावधारक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
गोकुळ निवडणुकीत सध्या महायुतीतील जागावाटप आणि उमेदवार निवडीवरून चर्चेला उधाण आले असून, सतेज पाटील यांनीही निवडणूक लढविण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे इंगवले यांच्या उमेदवारीच्या मागणीमुळे हातकणंगले-शिरोळ पट्ट्यातील राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
बैठकीस हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंगवले यांच्या उमेदवारीसाठी एकजूट दाखवत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला एकमुखी पाठिंबा देण्यात आल्याने गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये या बैठकीची चर्चा सुरू झाली आहे.