कुंभोज / विनोद शिंगे
दिंडीचे आयोजन हे छोटं पाऊल असलं तरी समाजाच्या परिवर्तनासाठी मात्र मोठं पाऊल आहे हा उद्देश लक्षात घेऊन गुरुकुल शिक्षण प्रणालीचे प्रणेते गुरुदेव श्री 108 समंतभद्रजी महाराज यांच्या 132 व्या जन्मजयंती निमित्त श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर बाहुबली या प्रशालेची 12 वी समाज प्रबोधन दिंडी मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी कवठेसार (ता. शिरोळ )मध्ये आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरण व स्वागतगीताने झाली. गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली. कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविकात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी व उद्देश सांगितला.या समाज प्रबोधन दिंडीचे उद्घाटन मा. श्री. पोपट भोकरे (लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत, कवठेसार) यांच्या शुभहस्ते करण्यात आले,तर सत्य आणि प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी दिंडीस हिरवे निशाण दाखवून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा.श्री सुभाष माने यांनी प्रारंभ केला. या कार्यक्रमास मा.श्री सचिन सुतार (उपसरपंच) तसेच कवठेसार ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. तसेच मा.श्री आप्पासाहेब तेरदाळे,मा.श्री सुरेश पाटील, दादा नाना भोकरे हायस्कूल कवठेसारच्या मुख्याध्यापिका सौ.एस. एस. पाटील मॅडम तसेच कवठेसार मधील सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पत्रकार बंधू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात शालेय समितीचे सन्माननीय सदस्यही उपस्थित होते.या समाज प्रबोधन दिंडीमध्ये गुरुदेव समंतभद्र महाराजांचा भव्य चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. समाजातील बदलांसाठी प्रबोधनाची गरज आहे यासाठी ओळख थोरांची, निसर्ग संवर्धन, पंढरीचे वारकरी- संतांचा महिमा, भारत दर्शन, महाराष्ट्राची परंपरा, शिवरायांचे शिलेदार अशा वेशभूषेत बालचमुंनी जनजागृती केली. या संपूर्ण दिंडीत शाहिरांनी आपल्या दमदार आवाजात लोकांचे प्रबोधन केले.
मोबाईलचे वेड या विषयावर विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांचे झांज व लेझीमचे प्रात्यक्षिकही नेत्रदीपक होते.या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही शिस्त दाखवली. कवठेसार मधील पालकांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पाणी व खाऊची सोय करून मोलाचे सहकार्य केले.तसेच परिसर स्वच्छता, सुशोभीकरण,नाश्ता व दुधाची उत्तम सोय करून मिळालेल्या संधीचे सोने करून ही दिंडी संस्मरणीय केली.या दिंडीस गावातील इतर लोकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.तसेच एम.जी.शहा हायस्कूलच्या स्वयंसेवकांची मोलाची मदत लाभली आणि ही दिंडी यशस्वीरित्या संपन्न झाली.या कार्यक्रमाचे आभार सौ.माधुरी मगदूम यांनी मानले,तर सूत्रसंचालन सौ. दिपाली चावरे यांनी केले.